अमेरिकेत सलग तिसरा हल्ला...! दोन ट्रक घुसविल्यानंतर आता नाईट क्लबवर गोळीबार; ११ जणांना गोळ्या लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:44 IST2025-01-02T11:44:35+5:302025-01-02T11:44:51+5:30
गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता, यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्ब स्फोट घडविण्यात आला होता.

अमेरिकेत सलग तिसरा हल्ला...! दोन ट्रक घुसविल्यानंतर आता नाईट क्लबवर गोळीबार; ११ जणांना गोळ्या लागल्या
नववर्षाच्या सुरुवातीला अमेरिका सलग तिसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरली आहे. गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता, यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्ब स्फोट घडविण्यात आला होता. या घटनेला २४ तास होत नाही तोच न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये गोळीबार करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कच्या क्वीन्स शहरातील अमाचुरी नाईट क्लबमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत ११ जणांना गोळ्या लागल्याचे सांगितले जात आहे. २४ तासांतील ही तिसरी घटना असल्याने अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोळीबाराची घटना घडताच न्यूयॉर्क पोलिसांच्या अनेक टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अद्याप काही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसून तिन्ही घटनांत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले आहेत.
पहिल्या घटनेत न्यू ऑर्लेन्स येथील बॉरबॉन मार्गावर नववर्षाच्या स्वागताला असंख्य लोक जमा झाले होते. त्यांचा जल्लोष सुरू होता. त्याचवेळी एका चालकाने पिकअप ट्रक गर्दीत घुसवला. चालकाने गोळीबार केल्याचेही काही जणांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलबाहेर सायबर ट्रकमध्ये ब्लास्ट घडविण्यात आला आहे. सायबर ट्रक स्फोटात एका व्यक्तीचा जो चालक होता त्याचा मृत्यू झाला आहे. तर आजुबाजुला उपस्थित असलेले सात जण जखमी आहेत. एफबीआय तपास करत असून यात फटाके, गॅसची टाकी आणि इंधनाचे अवशेष मिळाले आहेत.