चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:55 IST2025-12-18T10:55:07+5:302025-12-18T10:55:24+5:30
US Penny Discontinued : पेनीचे उत्पादन बंद करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचा वाढलेला उत्पादन खर्च. १ सेंट किमतीचे हे नाणे तयार करण्यासाठी अमेरिकन सरकारला तब्बल ३.७ ते ४ सेंट खर्च करावे लागत होते.

चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
अमेरिकन अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेले १ सेंटचे नाणे म्हणजेच 'पेनी' आता यापुढे तयार होणार नाही. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी फिलाडेल्फिया येथील टांकसाळीत शेवटची पेनी तयार करण्यात आली आणि एका ऐतिहासिक पर्वाचा शेवट झाला. विशेष म्हणजे, या शेवटच्या काही नाण्यांच्या विशेष संचाचा लिलाव करण्यात आला, ज्यातून तब्बल १६.७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १४० कोटी रुपये) जमा झाले आहेत.
पेनीचे उत्पादन बंद करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचा वाढलेला उत्पादन खर्च. १ सेंट किमतीचे हे नाणे तयार करण्यासाठी अमेरिकन सरकारला तब्बल ३.७ ते ४ सेंट खर्च करावे लागत होते. म्हणजेच नाण्याच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा त्याचा खर्च तिप्पट झाला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी उधळपट्टी रोखण्यासाठी या नाण्याची निर्मिती थांबवण्याचे आदेश दिले होते.
'ओमेगा' पेनी आणि लिलावाचा विक्रम
लिलावात ज्या नाण्यांनी विक्रम रचला, ती सामान्य नाणी नव्हती. उत्पादित केलेल्या शेवटच्या काही नाण्यांवर 'ओमेगा' (Ω) हे विशेष चिन्ह कोरण्यात आले होते. या संचामध्ये २४ कॅरेट सोन्याच्या पेनीचाही समावेश होता. या दुर्मिळतेमुळेच जगभरातील संग्राहकांनी यावर मोठी बोली लावली. सोशल मीडियावर या संचाची किंमत १५० कोटींच्या घरात गेल्याची चर्चा असून, अधिकृत आकडा १४० कोटींच्या (१६.७ दशलक्ष डॉलर्स) आसपास आहे.
जुन्या पेनीचे काय होणार?
ज्यांच्याकडे जुन्या पेनी आहेत, त्या चलनात वैध राहतील. तुम्ही त्यांचा वापर खरेदीसाठी करू शकता, मात्र आता बाजारात नवीन पेनी येणार नाहीत. या निर्णयामुळे अमेरिकन सरकारची दरवर्षी सुमारे ५६ दशलक्ष डॉलर्सची बचत होणार आहे.