वॉशिंग्टन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास सहमत झाले नाहीत, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पुतिन यांना दिला आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ते पुतिन यांच्याशी बोलण्यास आणि त्यांना वैयक्तिकरीत्या भेटण्यास नेहमीच तयार आहेत.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध कधीच सुरू व्हायला नको होते; येथील परिस्थिती भयानक आहे आणि लाखो लोक मरत आहेत. जर अमेरिकेकडे सक्षम राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध कधीच झाले नसते. जर मी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे घडले नसते. ट्रम्प यांनी असाही दावा केला की, त्यांच्या कार्यकाळात रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. (वृत्तसंस्था)
१० लाख रशियन सैनिक मारले गेले, देश चालवण्याचा हा मार्ग नाही. ७ लाख युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.रशिया मोठ्या संकटात आहे. तुम्ही त्यांची अर्थव्यवस्था पाहा, त्यांचा महागाई दर पाहा, असे ट्रम्प म्हणाले.
१ फेब्रुवारीपासून चीनवर १० टक्के कर लादणार ?डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांची टीम १ फेब्रुवारीपासून चीनवर १० टक्के शुल्क लादण्याचा विचार करत आहे. ट्रम्प म्हणाले की, चीनवर शुल्क लादण्याचा निर्णय ते मेक्सिको आणि कॅनडाला ‘फेंटानिल’ पाठवत आहेत की नाही यावर आधारित असेल.‘फेंटानिल’ हा एक प्रकारचा अमली पदार्थ आहे जो हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त शक्तिशाली आणि व्यसन लावणारा आहे. वस्तुस्थितीच्या आधारे आम्ही त्यावर ५० टक्के शुल्कही लादण्याचा विचार करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पहिल्या दौऱ्यात ते शुक्रवारी लॉस एंजेलिस, नेवाडा आणि उत्तर कॅरोलिना येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बराक ओबामा प्रथम स्थानी बराक ओबामा यांच्या दुसऱ्या कार्यकाळात स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याची संख्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेत जास्त होती, असे समोर आले आहे. सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत ओबामा यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ११ लाख ६० हजार लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
तर कॅनडाही मागे राहणार नाही : कॅनडाचा इशाराटोरंटो : ट्रम्प यांनी कॅनडावरही २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यावर पंतप्रधान ट्रूडो म्हणाले की, आम्ही कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत. कॅनडा आणि कॅनेडियन लोकांसाठी हा कठीण काळ आहेत.