संपूर्ण अंतराळ लवकरच ड्रॅगनच्या विळख्यात; सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यावर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 05:36 IST2022-10-13T05:35:50+5:302022-10-13T05:36:08+5:30
अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे.

संपूर्ण अंतराळ लवकरच ड्रॅगनच्या विळख्यात; सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यावर काम सुरू
लंडन : आक्रमक रशियाच्या विस्तारवादाचे चटके बसत असतानाच चीनच्या कृत्यांची झळही जगाला सोसावी लागणार आहे. इंग्लंडच्या गुप्तहेर संस्थेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी इशारा दिला आहे की, चीनने आता अंतराळात आपली ताकद वाढवण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. अत्याधुनिक सॅटेलाइट नेटवर्क ताकदीच्या जोरावर चीन इतर देशांच्या सॅटेलाइटवर नियंत्रण मिळवणे, ते पाडणे आदी मनसुबे रचत आहे. सॅटेलाइट पाडण्याच्या लेझर सिस्टिमवर चीनने काम सुरू केले आहे.
फ्लेमिंग म्हणाले की, एक पक्षीय रचना हे चीनचे बलस्थान आहे. या माध्यमातून चीनचा भर त्यांच्या नागरिकांवर अधिकाधिक अंकुश कसा ठेवता येईल, याकडे असतो. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून तेथील सरकार नागरिकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधत असते. अर्थव्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी देशातील नागरिकांनी अहोरात्र झटत राहावे आणि पक्षाने देशाच्या संसाधनांचा वापर करून सुरक्षा आणि निगराणीचे कायदे अधिक कठोर करण्याकडे लक्ष द्यावे, याकडे चीनचे सतत लक्ष असते.
अंतराळात स्टार वॉर्स
फ्लेमिंग यांनी इशारा दिला की, अंतराळावर कब्जा करण्यासाठी चीन स्टार वॉर्स चित्रपटांप्रमाणे हत्यारे विकसित करणार आहे. चीन आणि रशिया दोनच देशांकडे सॅटेलाइटविरोधी शस्त्रे आहेत. चीन अशी लेझर सिस्टिम विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे जी शत्रू देशांचे दूरसंचार सेवा आणि निगराणीसाठी उपयुक्त असणारे सॅटेलाइट नष्ट करू शकते. सॅटेलाइट नष्ट केल्याने शत्रूला आपल्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मागही काढता येणार नाही.