बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:45 IST2025-12-11T13:43:49+5:302025-12-11T13:45:10+5:30
निवडणूक आणि रेफरेंडमसाठी मतदान एकाच वेळी वेगवेगळ्या बॅलेटवर होईल

बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
ढाका - बांगलादेशात पुढच्या निवडणुका आणि देशातंर्गत झालेल्या आंदोलनाच्या मागणीवर रेफरेंडम तारखांची घोषणा आज होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता बांगलादेशातील मुख्य निवडणूक आयुक्त नसीरुद्दीन यांच्या भाषणातून ही घोषणा करण्यात येईल. राष्ट्राला संबोधित रेकॉर्ड व्हिडिओ लाईव्ह केला जाईल. आज संध्याकाळापासून बांगलादेशात आचार संहिता लागू होणार आहे.
सचिव अख्तर अहमद यांनी म्हटलं की, निवडणूक आणि रेफरेंडमसाठी मतदान एकाच वेळी वेगवेगळ्या बॅलेटवर होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांची भेट घेतली. त्याशिवाय देशाचे मुख्य न्यायाधीश सैयद रैफत अहमद यांनाही निवडणुकीच्या तयारीचा आढावा दिला. देशातील सामान्य निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा रेफरेंडमची सुरू आहे. ज्यात जुलै २०२४ मध्ये शेख हसीना सरकार विरुद्ध झालेल्या आंदोलनात उचललेल्या मुद्द्यांवर जनतेची मते मागवण्यात आली आहे.
२ मतदान, मोठं आव्हान
बांगलादेशातील गृह विभागाने निवडणुकीची तयारी केली आहे. एकाच दिवसांत होणाऱ्या २ मतदानामुळे आव्हान वाढले आहे. बॅलेट पेपर आणि कायदा सुव्यवस्था याचीही तयारी झाली आहे. मतदान सकाळी ७.३० वाजता सुरू होईल, ते संध्याकाळी ५ वाजता संपेल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल असं बोलले जाते.
रेफरेंडम खास का?
जुलैच्या चार्टरमध्ये मुख्यत: संविधानात बदल करून संसदेचे २ सभागृह बनवण्याची मागणी आहे. ज्यात वरिष्ठ सभागृहाची व्यवस्था असावी. त्याशिवाय सर्व अधिकार केवळ पंतप्रधानांकडे नको. राष्ट्रपती आणि इतर विभागांनाही स्वायत्त अधिकार मिळावेत. ज्यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होईल. त्यात राज्यांना स्वतंत्र अधिकार देण्याची मागणी होती. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे बॅनर हटवण्याचे निर्देश दिले जातील. अंतरिम सरकारचे सर्व सल्लागार, अधिकारी आता सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही.
दरम्यान, माजी पंतप्रधान आणि बीएनपी मुख्य खालिदा जिया यांची तब्येत ढासळली आहे त्यांना उपचारासाठी लंडनला नेण्याची तयारी आहे. अवासी लीगची मान्यता रद्द झाल्याने त्यांच्या निवडणूक चिन्हावर कुणालाही निवडणूक लढण्याची परवानगी नाही. जमात ए इस्लामीसारख्या इतर संघटना आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी आहे.