ज्या इराणकडूनभारतीय कंपन्यांनी कच्चे तेल खरेदी केले त्या कंपन्यांवर अमेरिकेने नुकतीच बंदी आणली होती. तसेच पाकिस्तानला त्यांचे कच्च्या तेलाचे साठे विकसित करण्यासाठी मदत करण्याची डील केली होती. एवढेच नाही तर ज्या इराणवर अमेरिकेने जगातील सर्वात शक्तीशाली विमानांमधून हल्ले केले होते, त्याच इराणच्या अण्वस्त्र निर्मितीला पाकिस्तानने पाठिंबा जाहीर केला आहे. भारतासोबत दुटप्पी वागणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका आता काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जून महिन्यात इस्रायलने इराणवर हल्ले केले होते. यानंतर अमेरिकेने बी-२ बॉम्बरमधून १५ बंकर बस्टर बॉम्ब आणि शेकडो लढाऊ विमानांनी हल्ले चढविले होते. याला महिना होत नाही तोच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणच्या अण्वस्त्रांच्या स्वप्नांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान शांततापूर्ण अणुऊर्जा मिळविण्याच्या इराणच्या उद्दिष्टांच्या बाजूने उभा आहे, असे शरीफ म्हणाले.
पाकिस्तान आणि इराण यांनी द्विपक्षीय व्यापार तीन पटीने वाढवण्यावर सहमती दर्शविली. सध्याचा व्यापार ३ अब्ज डॉलर्सचा आहे, तो १० अब्जवर नेण्यात येणार आहे. शरीफ आणि पेझेश्कियान यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोघांनी एकूण १२ करारांवर स्वाक्षरी केली. हे करार तेव्हा झाले आहेत, जेव्हा ट्रम्पनी पाकिस्तानला शुल्कात अनेक सवलती दिल्या आहेत आणि पाकिस्तानवर फक्त १९ टक्के शुल्क लादले आहे.
अमेरिकेने भारतावर अणुचाचणीवेळी निर्बंध लादले होते. परंतू, काही वर्षांनी पाकिस्तानने अणु चाचणी केली तेव्हा मात्र पाकिस्तानला असेच सोडून दिले होते. इराणसारखीच कारवाई पाकिस्तानवर का केली नाही, याचे कारण अमेरिकेचा भारतद्वेष हे आहे. अमेरिकेने भारताला अनेकदा त्रास दिला आहे. जागतिक संघटना देखील पाकिस्तानची कुवत नसताना पाकिस्तानला झुकते माप देत असतात. पाकिस्तान तो आलेला पैसा दहशतवाद्यांना पोसण्यासाठी खर्च करते आणि भारतावर हल्ले केले जातात. अनेकदा हे सिद्ध होऊन देखील पाकिस्तानला भीक दिली जाते.