'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:23 IST2025-10-10T19:21:19+5:302025-10-10T19:23:31+5:30
Donald Trump Nobel Peace Prize: नोबेल शांतता पुरस्कार मिळावा म्हणून खटाटोप करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भ्रमनिरास झाला. युद्ध थांबवल्याचे दावे करूनही नोबेल समितीने ट्रम्प यांना ठेंगा दाखवला.

'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
Nobel Peace Prize 2025 Trump Reaction: व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेचा नोबेल मिरवण्याचे स्वप्न भंगले. नोबेल समितीने नावाची घोषणा केल्यानंतर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया आली. व्हाईट हाऊसने ट्रम्प यांना डावलल्यानंतर समितीवर राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
व्हाईट हाऊसचे माध्यम संचालक स्टीवन च्युंग यांनी नोबेल समितीच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, "नोबेल समितीने शांतता निवडण्याऐवजी राजकारणाला प्राधान्यक्रम दिला."
"ट्रम्प युद्ध थांबवत राहणार, लोकांचे प्राण वाचवत राहणार"
स्टीवन च्युंग यांनी एक्स सोशल मीडिया हॅण्डलवर म्हटले आहे की, "राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प शांतता करार करत राहणार, युद्ध थांबवत राहणार आणि लोकांचे प्राण वाचवणार. नोबेल समितीने हे सिद्ध केलं की, त्यांनी शांतता नाही, तर राजकारण निवडले आहे", अशी घणाघाती च्युंग यांनी मारिया कोरिना मचाडो यांचे नाव जाहीर झाल्यानंतर केली.
"डोनाल्ड ट्रम्प यांचे मन हे खऱ्या मानवतावादी माणसाचे आहे. त्यांच्यासारखा कुणीही नाही, जो आपल्या इच्छाशक्तीने अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो", असे च्युंग यांनी म्हटले आहे.
नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांची निवड का केली?
मारिया यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले की, "जगातील अनेक भागांमध्ये हुकुमशाही वाढत असताना आणि लोकशाही कमकुवत होत असताना मारिया कोरिना मचाडो यांच्यासारख्या व्यक्तीचे धाडस नवीन आशादायक आहे. लोकशाही ही चिरंतन शांततेची पूर्वअट आहे. ज्यावेळी सत्ता हिंसा आणि भीतीद्वारे जनतेला दडपते तेव्हा अशा धाडसी व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक ठरते."
ट्रम्प यांच्याकडून आठ युद्ध थांबवल्याचा दावा
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचाही अर्ज नोबेल शांतता पुरस्कारासाठी आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आठ युद्ध थांबवल्याचा दावाही केला गेला. व्हाईट हाऊसकडूनही ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचे सांगितले गेले. पण, मारिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून नोबेलसाठी त्यांची निवड केली गेली.