घरच्यांना फोनवर सुरक्षित असल्याचे सांगत होती भारतीय महिला, तितक्यात रॉकेट आदळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 13:35 IST2023-10-09T13:35:36+5:302023-10-09T13:35:53+5:30
अमेरिकेचे चार नागरिक मारले गेल्याने अमेरिकेने थेट युद्धात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. इस्रायलला उघड उघड युद्धनौका आणि लढाऊ विमानांसह सैनिकही मदतीसाठी पाठविले आहेत.

घरच्यांना फोनवर सुरक्षित असल्याचे सांगत होती भारतीय महिला, तितक्यात रॉकेट आदळले
इस्रायलवर दहशतवादी संघटनेने अचानक हवाई आणि दहशतवादी घुसवून हल्ला केल्याने युद्धाला तोंड फुटले आहे. इस्रायल सैन्याला सावरायचा वेळच मिळाला नव्हता. यामुळे नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणे गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. याचा परिणाम या हल्ल्यात परदेशी नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे चार नागरिक मारले गेल्याने अमेरिकेने थेट युद्धात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. इस्रायलला उघड उघड युद्धनौका आणि लढाऊ विमानांसह सैनिकही मदतीसाठी पाठविले आहेत. अशातच आणखी एक महत्वाची बातमी येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय महिला जखमी झाली आहे. तर १० नेपाळी नागरिक मारले गेले आहेत.
केरळमधील महिला गेल्या काही वर्षांपासून इस्राय़लमध्य़े काम करत होती. तिची हालत गंभीर असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव शिजा आनंद (वय ४१ वर्षे) असे आहे. ती रॉकेट हल्ल्यात जखमी झाली आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर शीजा आनंदने केरळमधील तिच्या कुटुंबीयांशी बोलून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली होती. मात्र फोन सुरू असताना तिचा फोन कट झाला. तिच्यावर रॉकेट येऊन पडले होते. एक शस्त्रक्रिया झाली असून दुसरी शस्त्रक्रिया लवकरच होणार आहे.