२५ मजली इमारतीएवढी उंची अन् ४०० वर्षे वयाचे झाड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:38 IST2022-10-10T05:38:21+5:302022-10-10T05:38:35+5:30
बुंधा ३५ फूट रुंद; ॲमेझाॅनच्या जंगलात आढळले झाड

२५ मजली इमारतीएवढी उंची अन् ४०० वर्षे वयाचे झाड !
वॉशिंग्टन : जगातील सर्वांत मोठ्या ॲमेझॉन जंगलामध्ये सर्वांत मोठे झाड आढळून आले आहे. या झाडाची उंची २९० फूट असून, त्याच्या बुंध्याची रुंदी ३५ फूट आहे. एखाद्या २५ मजल्यांच्या इमारतीइतकी या झाडाची उंची आहे. ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात सुमारे तीन वर्षे सर्वांत उंच झाडाचा शोध सुरू होता. त्यासाठी केलेले चार प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता हे यश मिळाले आहे. १९ जणांच्या शोधपथकाने अखेर ही मोहीम फत्ते केली.
ॲमेझॉन जंगलातील सर्वांत उंच झाड हे एंजेलिम व्हर्मिलो या प्रजातीचे आहे. त्याचा शास्त्रीय नाव डिनिजिया एक्सकेल्सा असे आहे. गेल्या १२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत पार पडलेल्या मोहिमेत शास्त्रज्ञांनी या सर्वांत उंच झाडाचा शोध घेतला. त्यासाठी त्यांनी बोटीच्या साहाय्याने २५० किमीचा प्रवास केला. तसेच डोंगराळ भागात २० किमी इतक्या अंतराची पायपीट केली. हे झाड ४०० ते ६०० वर्षे जुने आहे.
२०१९ मध्ये एका उपग्रहाने ॲमेझॉनच्या जंगलातील सर्वांत मोठ्या झाडाचे छायाचित्र टिपले होेते. त्या झाडापर्यंत पोहोचण्यासाठी थ्रीडी मॅपिंगची मदत घेण्यात आली होती. या शोधमोहिमेतील सदस्यांनी त्यासाठी १० दिवसांचा प्रवासही केला. त्यात काही सदस्यांची प्रकृती बिघडल्याने २०१९ सालातील शोधमोहीम गुंडाळावी लागली. (वृत्तसंस्था)
वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ
nॲमेझॉन जंगलातील सर्वांत उंच झाड एंजेलिम व्हर्मिलो प्रजातीचे आहे. त्याचे लाकूड अतिशय महागडे आहे. त्यामुळे ही झाडे मोठ्या प्रमाणावर तोडली जातात.
nॲमेझॉनच्या जंगलात वाहणाऱ्या नदीच्या किनारी प्रदेशातील भूगर्भात सोन्याचे साठे आहेत. त्यासाठी अवैध खाणकामही केले जाते. तसेच वृक्षतोडीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. या कारणामुळेही एंजेलिम व्हर्मिलो प्रजातीच्या झाडांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.