ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:45 IST2025-10-28T17:35:57+5:302025-10-28T17:45:35+5:30
रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश, लुकोइलने आपली परदेशातील मालमत्ता विकण्याची घोषणा केली. युक्रेन युद्धाच्या संदर्भात गेल्या आठवड्यात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर, लुकोइलने सोमवारी हा निर्णय घेतला.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
मागील काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली. पण, अजूनही यश आलेले नाही. दरम्यान, ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील दरी वाढली.
याची किंमत एका रशियन तेल कंपनीला चुकवावी लागत आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियन तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे . त्यांचे जागतिक साम्राज्य हळूहळू कोसळत आहे. रशियाचा दुसरा सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी असलेल्या लुकोइलने आपली परदेशी मालमत्ता विकण्याची घोषणा केली आहे.
युक्रेन युद्धासंदर्भात अमेरिकेने गेल्या आठवड्यात लादलेल्या निर्बंधांनंतर सोमवारी, लुकोइलने आपली आंतरराष्ट्रीय मालमत्ता रद्द करण्याची घोषणा केली. हे निर्बंध अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लादले आहेत आणि त्यांचा उद्देश रशियाला युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्यास भाग पाडणे आहे.
ल्युकोइलचा ११ देशांमध्ये तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये हिस्सा
याबाबतचे एक निवेदन समोर आले आहे. ते संभाव्य खरेदीदारांशी चर्चा करत आहे. हे सौदे निर्बंध सवलतीच्या कालावधीत पूर्ण केले जातील, यामुळे २१ नोव्हेंबरपर्यंत व्यवहार करता येतील. आवश्यक असल्यास ही अंतिम मुदत वाढवता येईल, असे कंपनीने निवदेनात म्हटले आहे. ल्युकोइलचा ११ देशांमध्ये तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये हिस्सा आहे, यामध्ये बल्गेरिया आणि रोमानियामधील रिफायनरीज आणि नेदरलँड्समधील रिफायनरीत ४५ टक्के हिस्सा आहे.
२२ ऑक्टोबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन प्रमुख रशियन तेल कंपन्यांवर (लुकोइल आणि रोझनेफ्ट) नवीन निर्बंधांची घोषणा केली. रशियाच्या तेल निर्यातीपैकी जवळजवळ निम्म्या निर्यातीचा वाटा या कंपन्यांचा आहे. तेल आणि वायू क्षेत्रातील उत्पन्न हे रशियन सरकारच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी रशियाला युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शविण्याचे आवाहन केले आहे.
या निर्बंधांमुळे ल्युकोइल आणि रोझनेफ्ट यांना परदेशात व्यवसाय करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. अमेरिकन कंपन्यांना त्यांच्याशी व्यवहार करण्यापासून रोखण्याव्यतिरिक्त, या निर्बंधांचा परिणाम या कंपन्यांसोबत व्यवसाय करणाऱ्या परदेशी बँकांवरही होऊ शकतो, कारण त्यांनाही निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.