लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:59 IST2022-11-29T06:58:42+5:302022-11-29T06:59:30+5:30
कोरोना लॉकडाउनमुळे चीनमध्ये वातावरण तापले

लॉकडाऊनमुळे जनतेतील ‘ड्रॅगन’ खवळले; म्हणाले.. जिनपिंग खुर्ची सोडा
बीजिंग : चीनमधील शून्य कोरोना धोरणाविरोधात लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. बीजिंगपासून सुरू झालेली ही निदर्शने आता १३ मोठ्या शहरांपर्यंत पसरली आहेत. नागरिकांना रोखण्यासाठी पोलिस लाठीमार करून लोकांना अटक करत आहेत, मात्र लोकांचा राग वाढत आहे. रविवारी रात्रभर लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरूच ठेवत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची खुर्ची सोडावी, अशी मागणी केली. नागरिक लॉकडाऊन हटवून स्वातंत्र्य देण्याची मागणी करत घोषणा देत आहेत.
लोक इतके नाराज का?
n चीनमध्ये गेल्या १० महिन्यांपासून झिरो कोरोना धोरण लागू आहे. विविध निर्बंध आहेत, परंतु २५ नोव्हेंबर रोजी चीनमधील शिंजियांगमध्ये एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागल्याने संतापाचा भडका उडाला.
n या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे मदत वेळेवर पोहोचू शकली नाही.
n अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यानंतर बीजिंगमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि निदर्शने सुरू झाली.
आंदोलन कुठे?
राजधानी बीजिंग येथून हे आंदोलन सुरू झाले आणि लाँचो, शिआन, चोंगकिंग, वुहान, झेंगझोऊ, कोरला, होटन, ल्हासा, उरुमकी, शांघाय, नानजिंग, शिजियाझुआंग येथे पोहोचले. तीन दिवसांपासून येथील लोक सरकारविरोधात घोषणा देत आहेत.
६६ लाख घरात कैद
चीनमध्ये कोरोना सातत्याने वाढत आहे. २७ नोव्हेंबर रोजी कोरोनाचे ४० हजार रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. चीनमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे.