China Coronavirus: कोरोना व्हायरसवर कॉकटेल लस; 48 तासांत सुधारणा होत असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 16:07 IST2020-02-03T16:01:03+5:302020-02-03T16:07:10+5:30
एचआयव्ही आणि फ्ल्यूची औषधं वापरुन थायलँडच्या डॉक्टरांनी तयार केली कॉकटेल लस

China Coronavirus: कोरोना व्हायरसवर कॉकटेल लस; 48 तासांत सुधारणा होत असल्याचा दावा
बँकॉक: कोरोना व्हायरसची लस शोधण्यात यश आल्याचा दावा थायलंडमधल्या डॉक्टरांनी केला आहे. फ्लू आणि एचआयव्हीचं औषध एकत्र करुन कोरोना व्हायरसवर उपचार करणारी लस तयार केल्याचं थायलँडच्या डॉक्टरांनी सांगितलं. काही रुग्णांना नवी लस देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत ४८ तासांमध्ये सुधारणा झाल्याचं डॉक्टर म्हणाले. थायलंडच्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे कोरोना व्हायरस नियंत्रणात येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
बँकॉकच्या राजाविथी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी नव्या लसीचा वापर करुन काही रुग्णांवर उपचार केले. यातल्या बहुतांश रुग्णांची प्रकृती सुधारली. यामध्ये वुहानमधल्या एका ७० वर्षीय महिलेचादेखील समावेश आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी संबंधित महिलेला कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. तिच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे.
'आम्ही शोधून काढलेली लस म्हणजे उपचार नाही. मात्र त्यामुळे रुग्णांच्या स्थितीत वेगानं सुधारणा होत आहे. गेल्या १० दिवसांपासून आम्ही ही लस वापरत आहोत. काही औषधांचा एकत्रित वापर करुन तयार करण्यात आलेली लस ४८ तासांमध्ये परिणामकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे,' अशी माहिती राजाविथी रुग्णालयातले किडनी उपचार तज्ज्ञ डॉ. क्रिएनसाक अतिपॉर्नवानिच यांनी दिली. आम्ही तयार करत असलेली लस उपयोगी ठरत असली तरी याबाबतीत आणखी संधोशक आवश्यक असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.
थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे १९ रुग्ण आढळले आहेत. यातल्या आठ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अकरा जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतर चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनीदेखील एचआयव्ही आणि फ्ल्यूच्या औषधांचा वापर करुन कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरणारी लस शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनमधल्या ९ हजारपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३६१ जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे.