बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:55 IST2019-09-23T03:12:33+5:302019-09-23T06:55:23+5:30
सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे

बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय
नवी दिल्ली : सात महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बहल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केलेले पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षण तळ आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावर जवाबी कारवाई म्हणून भारताने बालाकोटचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यानंतर अंगाचा तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या आशीर्वादाने जैश-ए-मोहम्मदने आपले हे तळ पुन्हा सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी होणाऱ्या आमसभेत काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा आकांडतांडव करण्याचाही पाकिस्तानचा मनसुबा आहे.
पुलवामा घटना व भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर काही काळ शांत बसलेले पाकिस्तानातील दहशतवादी गट आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती अब्दुल रौफ असगरने पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (आयएसआय) अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताला कसे प्रत्युत्तर द्यायचे, याबाबत त्यांच्यात त्यावेळी चर्चा झाली.