Venezuela Attack: शनिवारी मध्यरात्री व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. आकाशात गर्जना करणारी लढाऊ विमाने आणि जमिनीवर एकामागोमाग एक झालेल्या किमान सात भीषण स्फोटांनी संपूर्ण शहर हादरले. विशेषतः लष्करी तळांच्या परिसरात हे स्फोट झाल्याने अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केल्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.
लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा संशय
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, काराकस मधील मुख्य लष्करी तळ फोर्ट टिउना आणि ला कार्लोटा या हवाई तळाजवळ हे स्फोट झाले. स्फोटांनंतर शहराच्या दक्षिणेकडील भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून संपूर्ण परिसर काळोखात बुडाला आहे. हिगुएरोटे विमानतळावरही मोठे स्फोट ऐकू आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
पहाटेच्या शांततेत झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिक घाबरून रस्त्यावर आले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतके भीषण होते की संपूर्ण जमीन हादरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये शहराच्या विविध भागांतून धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
शनिवारी रात्री व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये सीएनएनच्या एका टीमने अनेक स्फोट पाहिले. पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार रात्री १:५० च्या सुमारास झाला. सीएनएनचे प्रतिनिधी ओसमारी हर्नांडेझ म्हणाले, "एक स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याने माझ्या खिडकीच्या काचा हादरल्या." स्फोटांनंतर कराकसच्या अनेक भागात वीज खंडित झाली. अनेक विमानेही आकाशातून उडताना दिसली. व्हेनेझुएलाच्या संरक्षणमंत्र्यांचे घर आणि लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाचे 'मिशन व्हेनेझुएला'?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवण्यासाठी लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. मादुरो यांच्यावर नार्को-टेररिझम संदर्भात अमेरिकेत गुन्हे दाखल आहेत. सीबीएस न्यूजच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासन या बॉम्बफेकीच्या वृत्ताबाबत अनभिज्ञ नाही, ज्यामुळे या कारवाईमागे अमेरिकेचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आणीबाणी जाहीर केली असून त्यांनी, या साम्राज्यवादी आक्रमणाचा पराभव करण्यासाठी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
३५ जहाजे उद्ध्वस्त, ११५ ठारगेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर नाकेबंदी केली आहे. गेल्या आठवड्यात सीआयएने व्हेनेझुएलाच्या ड्रग कार्टेल्सवर ड्रोन हल्ला केला होता. आतापर्यंत अमेरिकेच्या कारवाईत ३५ बोटी नष्ट झाल्या असून सुमारे ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी सीआयएला व्हेनेझुएलामध्ये कारवाया करण्याचे विशेष अधिकार दिले आहेत, जेणेकरून अमली पदार्थांची तस्करी आणि स्थलांतरितांचा ओघ रोखता येईल.
या भीषण स्फोटांनंतर अद्याप पेंटागॉनकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ज्या पद्धतीने लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे, त्यावरून ही कारवाई मादुरो सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडण्यासाठी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Web Summary : Caracas was rocked by explosions near military bases, causing widespread panic and power outages. The US is suspected of involvement, while Maduro declared a state of emergency amid rising tensions.
Web Summary : काराकस में सैन्य अड्डों के पास विस्फोटों से दहशत और बिजली गुल। अमेरिका पर शामिल होने का शक, मादुरो ने आपातकाल घोषित किया, तनाव बढ़ा।