महाशिवरात्रीला १० लाख भाविक पशुपतिनाथ मंदिराला भेट देणार, प्रशासनाची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:16 IST2025-02-24T15:16:01+5:302025-02-24T15:16:24+5:30
महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी नेपाळ आणि भारतातील जवळपास दहा लाख भाविक येथील पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीला १० लाख भाविक पशुपतिनाथ मंदिराला भेट देणार, प्रशासनाची जोरदार तयारी
काठमांडू : महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी नेपाळ आणि भारतातील जवळपास दहा लाख भाविक येथील पशुपतिनाथ मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता आहे.
बागमती नदीच्या काठावर असलेल्या पाचव्या शतकातील मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जवळपास ४,००० साधू आणि हजारो भाविक काठमांडूमध्ये येतील, असे मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पशुपती क्षेत्र विकास ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुपती ट्रस्टच्या प्रवक्त्या रेवती अधिकारी म्हणाल्या की, या भव्य कार्यक्रमाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे.
महाशिवरात्रीला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एकूण १०,००० सुरक्षा कर्मचारी आणि ५,००० स्वयंसेवक तैनात केले जातील. तसेच, महाशिवरात्रीला पशुपतिनाथ मंदिर पहाटे २.१५ वाजता उघडेल आणि भाविकांना मंदिराच्या चारही दरवाज्यांमधून शिवलिंगाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रेवती अधिकारी यांनी दिली.
दरम्यान, काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाने महाशिवरात्री दरम्यान मंदिराभोवती दारू, मांस आणि माशांचे उत्पादन, विक्री, सेवन आणि वापरावर बंदी घालणारी सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार, सोमवार ते गुरुवार पशुपतिनाथ मंदिर परिसरात आणि आसपास दारू, मांस आणि मासे प्रतिबंधित असतील. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.