या मैत्रीसाठी थ्री चिअर्स; 2 वर्ष पैसे साठवून मित्रासाठी खरेदी केली इलेक्ट्रिक व्हिलचेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:37 IST2019-03-06T17:35:26+5:302019-03-06T17:37:29+5:30
दोघांच्या मैत्राची सोशल मीडियावर चर्चा

या मैत्रीसाठी थ्री चिअर्स; 2 वर्ष पैसे साठवून मित्रासाठी खरेदी केली इलेक्ट्रिक व्हिलचेअर
न्यूयॉर्क: अमेरिकेच्या अर्कान्सस राज्यात शिकणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली आहे. मैत्री किती घट्ट असू शकते, त्यामुळे एखाद्याचं आयुष्य कसं आणि किती बदलू शकतं, हे यातून दिसून आलं आहे. कॅड्डो हिल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या टॅनर व्हिल्सन आणि ब्रँडन क्वॉल्स यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात सुरू आहे. आपल्या मित्राला दररोजच्या आयुष्यात होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी टॅनरनं केलेली कृती अनेकांच्या हृदयाला भिडली.
टॅनरचा मित्र ब्रँडन दिव्यांग आहे. तो व्हिलचेअर वापरतो. ही व्हिलचेअर खूप जुनी असल्यानं ती ब्रँडनला ढकलावी लागायची. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, मैदानातून वर्गात येताना, स्वच्छतागृहात जात असताना ब्रँडनला बरेच कष्ट घ्यावे लागतात, ही गोष्ट टॅनरच्या लक्षात आली. यामुळे ब्रँडनचे हात खूप दुखतात. त्याला वेदना होतात, हे टॅनरच्या संवेदनशील मनाला जाणवलं. आपल्या मित्राचा हा त्रास दूर व्हायला हवा, असं त्याला वाटलं. मग त्यानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले.
ब्रँडनसाठी इलेक्ट्रिक व्हिलचेअर खरेदी करायची, असं टॅनरनं मनोमन ठरवलं. त्यासाठी त्यानं एका कार मॅकेनिककडे पार्ट टाईम नोकरी करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे ब्रँडननं गॅरेजमध्ये काम केल्याचं त्याची आई कॉलेन कॅरमॅकनं सीएनएनशी बोलताना सांगितलं. पुरेसे पैसे जमा झाल्यावर टॅनरनं मित्रासाठी इलेक्ट्रिक व्हिलचेअर खरेदी केली. ब्रँडन वर्गात येताच टॅनरनं स्वकमाईतून खरेदी केलेली इलेक्ट्रिक व्हिलचेअर त्याच्यासमोर आणली. टॅनरनं दिलेलं हे गिफ्ट पाहून ब्रँडन निशब्द झालं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. 'त्यानं माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट केली. माझा खरंच माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही,' अशी भावना ब्रँडननं व्यक्त केली. 'आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हिलचेअर असावी, असं माझं स्वप्न होतं. ते टॅनरमुळे सत्यात उतरलं,' असंदेखील तो पुढे म्हणाला.
मित्राच्या डोळ्यातले अश्रू पाहून टॅनरदेखील गलबलला. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. तो कायम माझ्यासोबत असतो. त्यामुळे त्याला ही भेट द्यावीशी वाटली, अशी भावना टॅनरनं व्यक्त केली. ब्रँडन आणि टॅनरच्या मैत्रीची कहाणी आता जगभरात पोहोचली आहे. फेसबुकवर त्यांच्या मैत्रीशी संबंधित पोस्टला शेकडो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. कॅड्डो हिल्स हायस्कूलनं ही पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याशिवाय त्यांनी या दोघांचा व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे.