इस्लामाबाद : सिंधू जल करार स्थगित केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आहे. शत्रू आमचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही तर पाणी रोखण्याची धमकी दिली आहे. असे केल्यास पाकिस्तान असा धडा शिकवील की, जन्मभर लक्षात ठेवाल, असे शरीफ यांनी म्हटले आहे.
पाककडे वाहणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते कराराचे उल्लंघन होईल. याचे उत्तर निर्णायक पद्धतीने दिले जाईल. पाणी पाकिस्तानची लाइफलाइन आहे आणि आंतरराष्ट्रीय करारांनुसार देशाच्या अधिकारांशी कोणताही समझोता केला जाऊ शकत नाही.
४८ तासांत तीन नेत्यांच्या धमक्या
सिंधू जल कराराबाबत मागील ४८ तासांत पाकच्या ३ नेत्यांनी भारताला धमक्या दिल्या आहेत. यात लष्करप्रमुख आसिम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ व माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांचा समावेश आहे. भारताने सिंधू नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तान ते १० क्षेपणास्त्रांनी उडवून देईल, असे आसिम मुनीर म्हणाले होते. सिंधू जल करार स्थगित केला तर पाककडे युद्धाशिवाय कोणताही पर्याय नाही, असे पाकचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो म्हणाले होते.
अमेरिका-पाकिस्तान दहशतवाद संपवणार
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए), इस्लामिक स्टेट-खुरासान व तालिबानसह प्रमुख संघटनांशी निपटण्यासाठी अमेरिका-पाकिस्तान सहमत झाले आहेत.
बीएलएला अतिरेकी संघटना घोषित केल्याच्या दुसऱ्या दिवशी या घडामोडी घडल्या आहेत. या बैठकीच्या सह-अध्यक्षपदी पाकचे संयुक्त राष्ट्र व्यवहारविषयक विशेष सचिव नबील मुनीर होते.
भारत, पाकशी आमचे चांगले संबंध : अमेरिका
अमेरिकेचे भारत व पाकशी चांगले संबंध आहेत, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितले की, दोन्ही देशांसमवेत मिळून काम करणे क्षेत्र व जगासाठी चांगली गोष्ट आहे.