पाकिस्तानमध्ये आता चहा पिण्यावरही गंडांतर!, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 05:40 IST2022-06-16T05:40:03+5:302022-06-16T05:40:30+5:30
पाकिस्तानची अर्थव्यवस्था खंगू लागली आहे. परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादू लागले आहे.

पाकिस्तानमध्ये आता चहा पिण्यावरही गंडांतर!, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारचे आवाहन
इस्लामाबाद :
पाकिस्तानची अर्थव्यवस्था खंगू लागली आहे. परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार सातत्याने जनतेवर निर्बंध लादू लागले आहे. सुरुवात लग्नाच्या वरातीवरून झाली. रात्री दहानंतर कोणीही वरात काढू नये, असा फतवा निघाला. आता दिवसभरात एक-दोन कप चहा कमी प्या, असे आर्जव सरकारने केले आहे.
पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी बुधवारी इस्लामाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानी नागरिकांना एक-दोन कप चहा कमी प्या, असे आवाहन केले. पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा चहा आयातदार आहे. त्यासाठी कर्ज काढावे लागते. सध्या देशाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, म्हणून हे आवाहन करत असल्याची पुस्ती इक्बाल यांनी जोडली.
वर्षात रिचवला ८४ अब्जांचा चहा
२०२१-२२ या आर्थिक वर्षात पाकिस्तानी नागरिकांनी ८४ अब्ज रुपये किमतीचा चहा रिचवला. पाकच्या आर्थिक अंदाजपत्रकानुसार १३ अब्जांचा चहा सरकारला आयात करावा लागला. त्यामुळे अतिरिक्त चहा पिण्याची सवय कमी करून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. अन्यथा कर्ज काढून चहाची आयात करावी लागेल, असे इक्बाल यांचे म्हणणे आहे.
आम्हाला मूर्ख समजता का, नागरिकांनी उडविली टर
इक्बाल यांच्या आवाहनाची मात्र पाकिस्तानी नागरिकांनी जोरदार टर उडवली आहे. सरकार आम्हाला मूर्ख समजत आहे का, असा सवाल करत आम्ही चहा पिण्याचा हक्क कधीच सोडणार नाही, असे एका ट्विटर युझरने म्हटले आहे. अन्य एकाने हे आवाहन धुडकावण्याचा निर्धार व्यक्त केला.