"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:08 IST2025-12-20T12:07:31+5:302025-12-20T12:08:09+5:30
आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे...

"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत अमेरिकेतील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नॉर्थ कॅरोलिना येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी 'टॅरिफ' (अयात शुल्क) आणि 'टॅक्स कट्स' (कर कपात) संदर्भात मोठे विधाने केले. आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आता 'टॅरिफ' पाचव्या क्रमांकाचा आवडता शब्द -
आपल्या भाषणात ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले, "पूर्वी 'टॅरिफ' हा माझा सर्वात आवडता शब्द होता. मात्र, माझ्या या विधानावरून 'फेक न्यूज' वाल्यांनी माझ्यावरच प्रश्न उपस्थित केले, मग धर्माचे काय, देवाचे काय, कुटुंबाचे काय आणि पत्नी-मुलांचे काय? यामुळे आता 'टॅरिफ' माझा पाचवा आवडता शब्द आहे." यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. आपल्या बोलण्याचा विपर्यास करून दाखवले जाते. यामुळे मी आता शब्दांच्या बाबतीत अधिक सतर्क झालो आहे, असेही ट्रम्प म्हम्हणाले.
VIDEO | North Carolina: US President Donald Trump says, “Tariff is… and I won't say it because it gets me in trouble, my favorite word… No, I want it to be my fifth favourite word. Do you remember when I said the word tariff is my favorite word in the dictionary? And then the… pic.twitter.com/AeK44Z68VQ
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2025
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी -
नवीन वर्षात अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. "येत्या वर्षात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर कपात लागू केली जाईल," असे त्यांनी जाहीर केले आहे. यात, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता 'टिप्स'वर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच, अतिरिक्त काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'ओव्हरटाइम' देखील करमुक्त केला जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा -
'सोशल सिक्युरिटी'वरही आता कुठलाही कर आकारला जाणार नाही, यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक आधार मिळेल.
ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या या धोरणांचे 'नाट्यमय परिणाम' लवकरच दिसू लागतील. सर्वसामान्यांच्या खिशात अधिक पैसे शिल्लक राहील आणि देशाची अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होईल.