नवी दिल्ली - अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून भारतावर हे टॅरिफ लादले होते. सध्या भारतीय मालावर २५ टक्के टॅरिफ लागू आहे; परंतु रशियाकडून कच्चे तेल आणि लष्करी उपकरण खरेदी केल्यामुळे आणखी २५ टक्के शुल्क लावले गेले आहे. त्यामुळे एकूण ५० टक्के टॅरिफ लागू होणार आहे. उच्च अतिरिक्त आयात शुल्कामुळे भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या ८६ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक निर्यातीवर म्हणजे ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम होईल. तर औषध, इलेक्ट्रॉनिक्स आणि पेट्रोलियम उत्पादनांसह उर्वरित वस्तूंना टॅरिफमधून सूट राहील.
अमेरिकेने काढलेल्या अधिसूचनेनुसार, ‘२७ ऑगस्ट २०२५ रोजी ईस्टर्न डेलाइट टाइम (इडीटी) नुसार रात्री १२:०१ वाजता किंवा त्यानंतर वापरासाठी (देशात) आणलेल्या किंवा गोदामातून काढून टाकलेल्या भारतीय उत्पादनांवर हे शुल्क लागू होईल.’
कच्चे तेल ६७ डॉलर प्रति बॅरलवरअमेरिकन टॅरिफमुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत १.४८ टक्क्यांची घसरण होत ६७.७८ डॉलर प्रति बॅरलवर आल्या आहेत.
स्वदेशीचा अभिमान बाळगा, जीवनमंत्र बनवा : पंतप्रधान अहमदाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘स्वदेशी’ला प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा मंत्र बनवण्याचे आवाहन केले. अहमदाबादजवळ हंसळपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कार ‘ई-विटारा’ ला हिरवा झेंडा दाखवून ते बोलत होते. “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आता जगभरात ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक वाहने धावतील,” असे ते म्हणाले.माझ्या दृष्टीने स्वदेशीची व्याख्या सोपी आहे. माझ्यासाठी हे महत्त्वाचं नाही की पैसा कोणाचा आहे; डॉलर आहे की पाउंड, काळा आहे की पांढरा, पण त्या पैशातून जे उत्पादन होईल, त्यात घाम हा माझ्या देशबांधवांचा हवा. त्या उत्पादनात माझ्या मातीतला सुगंध असावा. स्वदेशीचा अभिमान बाळगा आणि त्याला जीवनमंत्र बनवा.
भारताला धोका काय? निर्यातदारांच्या मते, बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया आणि इंडोनेशिया यांसारख्या प्रमुख स्पर्धक देशांवरील टॅरिफ खूपच कमी असल्याने अनेक भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारपेठेतून बाहेर पडतील. वाढीव शुल्क लागू होण्यापूर्वीच काही कंपन्या अमेरिकेला वस्तू पाठवत आहेत. ८६ अब्ज डॉलरच्या निर्यातीतून ६६ टक्के निर्यात प्रभावित होईल, असे ‘जीटीआरआय’ने म्हटले आहे.
सेन्सेक्स, निफ्टी धडाममुंबई : अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २५% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी कोसळले. बीएसई सेन्सेक्स ८४९ अंकांनी घसरून ८०,७८६.५४ वर बंद झाला. एनएसई निफ्टी २५५.७० अंकांनी घसरला.
रुपया घसरला : अमेरिकेच्या अतिरिक्त टॅरिफमुळे चलन बाजारात दबाव वाढला असून, रुपया मंगळवारी १२ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८७.६८ या पातळीवर बंद झाला.
ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योगजगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका