चर्चा युक्रेन युद्ध थांबविण्याची, ट्रम्पनी गांजा बाळगल्याची शिक्षा भोगणाऱ्या शिक्षकाला रशियातून सोडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:58 IST2025-02-12T15:58:01+5:302025-02-12T15:58:30+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे.

चर्चा युक्रेन युद्ध थांबविण्याची, ट्रम्पनी गांजा बाळगल्याची शिक्षा भोगणाऱ्या शिक्षकाला रशियातून सोडविले
युक्रेन युद्धावरून अमेरिका आणि रशियाचे संबंध ताणलेले असताना एक लक्षवेधक घटना घडली आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी २०२१ पासून रशियाच्या तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेले अमेरिकन शिक्षक मार्क फोगेल यांची रशियाने तीन वर्षांतच सुटका केली आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे, ट्रम्पनी या शिक्षकाला मायदेशी आणण्यासाठी चार्टर्ड प्लेन पाठविले होते, हा शिक्षक विमानातून उतरताच त्याला थेट ट्रम्प यांच्या भेटीला व्हाईट हाऊसला नेण्यात आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे. यावेळी ट्रम्प यांनी, फोगेल यांना सोडविण्यासाठी छोटी भूमिका निभावली, यामुळे मी आनंदी आहे, असे म्हटले आहे.
फोगेल यांना रशियन कोर्टाने २०२२ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. ट्रम्प प्रशासन युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाशी चर्चा करत आहे. ही चर्चा सुरु असल्याने फोगेल यांची सुटका शक्य झाल्याचे अमेरिकेचे एनएसए माइक वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाचे मध्य पूर्व प्रकरणांसाठीचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे फोगेल यांना आणण्यासाठी विशेष विमानाने रशियाला गेले होते.
कोण आहेत फोगेल...
फोगेल हे काही रशियात पर्यटनाला गेले नव्हते. तर ते मॉस्कोतील एका अँग्लो अमेरिकन शाळेत इतिहासाचे शिक्षक होते. फोगेल यांच्या बॅगेतून १७ ग्रॅम गांजा सापडला होता. मॉस्को विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती. फोगेल यांचे वाढते वय आणि आरोग्याची चिंता ही कारणे देत अमेरिकेने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. ती रशियाने फेटाळली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पुतीन यांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. आधीच्या सरकारची मागणी रशियाने फेटाळून लावली होती, परंतू ट्रम्प येताच जादुची छडी फिरल्याप्रमाणे या शिक्षकाची सुटका झाली आहे.