तैवानमध्ये आता पाण्याचे होणार रेशनिंग
By Admin | Updated: April 9, 2015 00:37 IST2015-04-09T00:37:04+5:302015-04-09T00:37:04+5:30
भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे

तैवानमध्ये आता पाण्याचे होणार रेशनिंग
तैपेई : भारताचा शेजारी तैवानमध्ये यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सरकारवर पाण्याच्या वितरणासाठी रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. तब्बल १० लाख कुटुंबांची तहान भागविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. दर आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. तैवानच्या उत्तरेकडील अनेक शहरांत आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जलाशयातील साठ्याने तळ गाठला आहे.
तैवानमध्ये यंदा जलसाठ्याने तळ गाठला आहे. देशात यंदा १९४७ नंतरचा सर्वांत कमी पाऊस झाला आहे, असे तैवानच्या अर्थ व्यवहार मंत्रालयाने सांगितले. नागरिकांनी अशा बिकट वेळी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
राजधानी तैपेई वगळता उत्तरेकडील जवळपास सर्वच शहरांत भीषण पाणीटंचाई आहे. उत्तरेकडील शहरांना पाणीपुरवठा होणाऱ्या शिहमेन जलाशयातील साठा एकूण क्षमतेच्या २४.५६ टक्क्यांवर आला आहे. १९६४ नंतर प्रथमच या जलाशयाने ही पातळी गाठली आहे.
प्रशासनाने नागरिकांना स्वयंपाक, अंघोळ आणि स्वच्छतेसाठी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पाणीटंचाईचा औद्योगिक व रासायनिक कंपन्यांनाही फटका बसला आहे. सुमारे १,४०० कंपन्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून औद्योगिक पाणी वापरासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)