रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना ९ चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत; एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 21:21 IST2022-02-24T21:21:18+5:302022-02-24T21:21:38+5:30
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना चीन संधी साधण्याच्या तयारीत? तैवानच्या हद्दीत शिरली ९ लढाऊ विमानं

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना ९ चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत; एकच खळबळ
मॉस्को: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. बॉम्बवर्षावानं अनेक शहरं हादरली आहेत. युक्रेननं रशियाची ६ विमानं पाडली आहेत. रशियाचे ५० सैनिक ठार झाले आहेत. तर युक्रेनचे ४० सैनिक मारले गेल्याचा दावा रशियानं केला आहे. युक्रेनचं लष्करी विमान क्यिवजवळ कोसळलं आहे. यात १४ जण होते. रशियाचं सैन्य सामर्थ्य पाहता त्यासमोर युक्रेनचा निभाव लागणं अवघड आहे. एका बाजूला रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू असताना दुसरीकडे चीननं संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
चीननं आपली लढाऊ विमानं तैवानच्या दिशेनं पाठवली आहेत. चीन आणि तैवान यांच्यातला संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. चीननं अनेकदा तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच महिन्यात चीनच्या विमानांनी १२ वेळा तैवानवर अतिक्रमण केलं. आता पुन्हा एकदा चीनची ९ लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत दिसली आहेत. यानंतर प्रत्युत्तरादाखल तैवानची विमानं हवेत झेपावली आणि त्यांनी रेडिओच्या माध्यमातून चीनला इशारा दिला.
चिनी हवाई दलाची विमानं ADIZ क्षेत्रात पाहायला मिळाली. या विभागात आल्यानंतर विमानांना हवाई वाहतूक कंट्रोलरला आपली ओळख सांगावी लागते. चीनची विमानं सातत्यानं ADIZ क्षेत्रात घुसखोरी करतात. आतापर्यंत चीनकडून ४० लष्करी विमानं पाठवण्यात आली आहेत. यामध्ये १२ लढाऊ आणि १७ स्पॉटर विमानांचा समावेश आहे.
तैवान म्हणजे काही युक्रेन नाही. तो आमचा अभिन्न हिस्सा असल्याचं म्हणत कालच चीननं आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर तैवाननं सुरक्षा वाढवली आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनकडून हल्ला होऊ शकतो अशी भीती तैवानला आहे. ब्रिटनसह अन्य देशांनादेखील अशीच भीती वाटते.