Syria President Bashar Al-Assad Plane Crash: इस्लामिक शासन असलेल्या सीरिया देशात सत्तांतर झाले आहे. सीरियातील बंडखोरांनी देशावर नियंत्रण मिळवले असून, राजधानी दमास्कसचा ताबा घेतला आहे. दरम्यान, घटनेनंतर देशातून पळून गेलेले राष्ट्रप्रमुख बशर अल असद यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. बशर अल असद यांचे विमान कोसळल्याचा दावा केला जातोय. त्यांचे विमान हवेत असताना अचानक रडारवरुन गायब झाले आणि काही वेळानंतर विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा केला जातोय.
बंडखोरांनी विमान पाडले?मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानातून बशर अल असद आपल्या कुटुंबासह देश सोडून जात होते. दरम्यान, बंडखोरांनी हे विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. दुसरीकडे, बंडखोरांनी सीरियातील अलेप्पो, होम्स आणि दारासह प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. होम्समध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या वडिलांचा पुतळाही बंडखोरांनी उद्ध्वस्त केला. सीरियन सैन्य लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरले आहे.
पीएम जलालीने केली घोषणासीरियाचे पंतप्रधान मोहम्मद गाजी जलाली यांनी आपण शांततेने विरोधी पक्षाकडे कारभार सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. "मी माझ्या निवासस्थानी आहे, कुठेही गेलो नाही. मला माझ्या देशावर प्रेम आहे." त्यांनी सीरियन नागरिकांनाही शांततेचे आवाहन केले आहे. बशर सरकार कोसळल्यानंतर सीरियातील बंडखोर गट 'जिहादी हयात तहरीर अल-शाम' (एचटीएस) सत्तेवर येणार आहे. या गटाचा प्रमुख अबू मोहम्मद अल-गोलानी याच्या हाती देशाची सत्ता जाऊ शकते.
पन्नास वर्षांची सत्ता संपुष्टातपन्नास वर्षांपूर्वी बशर अल-असदचे वडील हाफेज अल-असाद यांनी मोठ्या रक्तपाताने देशाची सत्ता काबीज केली होती. बाथिस्ट राजवटीत (असाद पक्षाच्या) 50 वर्षांच्या दडपशाहीनंतर आणि 13 वर्षांच्या गुन्हेगारी, छळ, विस्थापनानंतर आणि सर्व प्रकारच्या कब्जा करणाऱ्या शक्तींना तोंड देत दीर्घ संघर्ष केल्यानंतर आज आम्ही सत्तेवर आलो आहोत, असं बंडखोरांनी सांगितले.