आश्चर्य...! कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:56 IST2018-11-16T17:56:11+5:302018-11-16T17:56:58+5:30
विरोधी पक्षाच्या खासदारांनी अणुउर्जेवरील प्रश्नावर पेनड्राईव्हच्या वापराबाबत प्रश्न विचारले तेव्हा हे मंत्री गोंधळलेले दिसले.

आश्चर्य...! कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख
टोकिओ : उभ्या आयुष्यात कधीही शाळेत न गेलेला नेता शिक्षणमंत्री, व्यवहारज्ञान नसलेला नेता अर्थमंत्री असे किस्से केवळ भारतातच होत नसून जगभरातही घडत असतात. अणुबॉम्बच्या राखेतून उसळी मारलेल्या जपानमध्येही असाच एक किस्सा मोठ्या चवीने चर्चिला जात आहे. आजच्या सायबर गुन्ह्यांच्या जगात हे गुन्हे रोखणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाला निदान कॉम्प्युटरचे ज्ञान तरी हवे. मात्र, जपानने एकदाही कॉम्प्युटर न वापरलेल्या नेत्यालाच या संस्थेचा मुख्य बनविले आहे.
जपानचे मंत्री योशीटाका साकुरादा (68) यांनी ही बाब संसदेतच कबुल केली आहे. त्यांनी सांगितले की आपण कधीच कॉम्प्युटर वापरलेला नाही. पेन ड्राईव्ह त्यांना संभ्रमात टाकतो. अशा या नेत्याला जपानच्या सायबर सिक्युरिटीचा प्रमुख बनविण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे साकुरादा 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धांचेही प्रभारी बनविण्यात आले आहे.
साकुरादा यांनी सांगितले की, आपण वयाच्या 25 व्या वर्षांपासून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत मात्र कधी कॉम्प्युटरचा वापर कधी केला नाही. जेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी अणुउर्जेवरील प्रश्नावर पेनड्राईव्हच्या वापराबाबत प्रश्न विचारले तेव्हा साकुरादा हे गोंधळलेले दिसले. त्यांना पेनड्राईव्ह हा प्रकार काय असतो हे देखिल माहिती नव्हते. विरोधी पक्षाचे नेते मसातो इमाई यांनी सांगितले की यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जो व्यक्ती सायबर सिक्युरिटीवर धोरण बनवतो त्याला कॉम्प्युटरचा गंधही नाही.
यावर सोशल मिडियावरही टिंगल करण्यात आली. जगातील कोणताही मोठा हॅकर साकुरादा यांचे काहीही वाकडे करू शकणार नाही. कारण त्यांची सुरक्षाच एका वेगळ्या प्रकारची आहे, अशी उपरोधिक टीका एका युजरने केली आहे.