1971 च्या युद्धात भारताने बुडवलेली; आता 54 वर्षांनंतर पाकिस्तानी नौसेनेला मिळाली 'PNS-गाजी' पाणबुडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:52 IST2025-12-18T15:51:45+5:302025-12-18T15:52:25+5:30
विशाखापट्टणमजवळ भारताने बुडवलेली पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस-गाझी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

1971 च्या युद्धात भारताने बुडवलेली; आता 54 वर्षांनंतर पाकिस्तानी नौसेनेला मिळाली 'PNS-गाजी' पाणबुडी
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात विशाखापट्टणमजवळ बुडालेली पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस-गाझी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, तब्बल 54 वर्षांनंतर पाकिस्तानने आपल्या नौदलात ‘पीएनएस-गाझी’ या नावाची नवी पाणबुडी सामील केली आहे. या नव्या पाणबुडीमुळे पाकिस्तानने आपल्या पराभवाच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत.
गाझी बुडाल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर
1971 च्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने विशाखापट्टणम बंदरा जवळ पाकिस्तानची पीएनएस-गाझी पाणबुडी उद्ध्वस्त केली होती. गाझी बुडाल्यानंतर पाकिस्तानची युद्धातील स्थिती कमकुवत झाली आणि त्यानंतरच पाकिस्तानने शरणागती पत्करण्याची घोषणा केली होती. मात्र, भारतीय नौदलाने गाझीला बुडवले, हे पाकिस्तानने अधिकृतरीत्या कधीही मान्य केले नाही. त्या पाणबुडीचे अवशेष आजही विशाखापट्टणमजवळ समुद्रात असल्याचे मानले जाते.
चीनकडून खरेदी केली नवीन पाणबुडी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने ‘गाझी’ नाव दिलेली पाणबुडी चीनकडून खरेदी केली आहे. 1971 मध्ये बुडालेली गाझी पाणबुडी अमेरिकेत बनवलेली होती. आता मात्र पाकिस्तान-चीन संरक्षण सहकार्याअंतर्गत ही नवी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे.
नवीन पीएनएस-गाझीचे वैशिष्ट्ये?
नवी पीएनएस-गाझी ही चीनची टाइप 039A/039B श्रेणीतील पाणबुडी आहे. ही पाणबुडी कराचीमध्येच तयार करण्यात आली असून, पाकिस्तान तिला ‘मेड इन पाकिस्तान’ म्हणून सादर करत आहे. 2015 मध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये या पाणबुडीसाठी करार झाला होता, तर 2026 मध्ये ती औपचारिकरीत्या नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
तांत्रिक वैशिष्ट्ये:
वजन: सुमारे 2800 टन
लांबी: 77 मीटर
चालक दल: 35 ते 40 नौसैनिक
वेग: 20 नॉट्स
क्षमतेत: सबसर्फेस-लॉन्च क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता
जुनी पीएनएस-गाझी कशी बुडाली होती?
बांग्लादेश मुक्तिसंग्रामाच्या काळात भारतीय नौदलाचे आयएनएस विक्रांत पाकिस्तानच्या सागरी तळांवर हल्ले करत होते. त्याला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने पीएनएस-गाझीला बंगालच्या उपसागरात पाठवले. बंगालच्या उपसागरात जाण्यापूर्वी ही पाणबुडी श्रीलंकेत नेण्यात आली. त्याच दरम्यान, आयएनएस विक्रांत विशाखापट्टणममध्ये असल्याची अफवा पसरवण्यात आली.
भारतीय डावपेच आणि निर्णायक क्षण
प्रत्यक्षात विक्रांत त्या वेळी विशाखापट्टणममध्ये नव्हती. भारतीय गुप्तचर संस्थांनी ही माहिती मुद्दाम लीक केली होती. ही माहिती मिळताच पाकिस्तानने गाझीला विशाखापट्टणमकडे वळवले. दरम्यान, पाणबुडीमध्ये इंधन गळती सुरू झाली, ती थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. विशाखापट्टणमजवळ तैनात आयएनएस राजपूतने संशयाच्या आधारे समुद्रात हल्ला केला. काही तासांतच बंदराजवळ भीषण स्फोट झाला, जो पीएनएस-गाझीमध्येच झाल्याचे स्पष्ट झाले. या स्फोटात गाझी पूर्णपणे नष्ट झाली.