‘आत्मघाती हल्ले इस्लामला अमान्य’
By Admin | Updated: May 18, 2015 23:55 IST2015-05-18T23:55:37+5:302015-05-18T23:55:37+5:30
पाकिस्तानातील २०० धार्मिक विद्वानांनी एक फतवा काढला असून, आत्मघाती हल्ले इस्लामला अमान्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे,

‘आत्मघाती हल्ले इस्लामला अमान्य’
लाहोर : पाकिस्तानातील २०० धार्मिक विद्वानांनी एक फतवा काढला असून, आत्मघाती हल्ले इस्लामला अमान्य असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, तसेच इस्लामी सरकारांनी तालिबान, इसिस व अल काईदा यासारख्या दहशतवादी संघटना चिरडून टाकल्या पाहिजेत असेही म्हटले आहे.
तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) अल काईदा, बोको हराम, अल शबाब, इसिस या सारख्या कथित दहशतवादी संघटनांची तत्त्वे दिशाभूल करणारी आहेत. त्यांचे कार्य बिगर इस्लामी असून, विचारप्रणाली इस्लामच्या अपुऱ्या ज्ञानावर आधारित आहे असे या उलेमांनी काढलेल्या फतव्यात म्हटले आहे.
विविध इस्लामी पंथांच्या विद्वानांची परिषद येथे आयोजित करण्यात आली होती.
या संघटनांची जिहादी विचारप्रणाली इस्लाम धर्माने सांगितलेल्या जिहादच्या अटीत बसत नाही. विविध पंथांच्या लोकांच्या हत्या करण्याचे या संघटनांचे कृत्य फसाद (हिंसाचार) आहे. कारण इस्लाम धर्माच्या नावाखाली कोणत्याही पंथाच्या लोकांची हत्या करता येत नाही. इस्लामी सरकारांनी अशा संघटना चिरडल्या पाहिजेत असेही या फतव्यात म्हटले आहे. पाकिस्तानात पोलिओविरोधी मोहीम व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हत्या करणारे लोक गुन्हेगार आहेत असेही फतव्यात म्हटले आहे. पाकिस्तानात तालिबानचा पोलिओ लस देण्यास विरोध असून त्यांनी आतापर्यंत महिला कर्मचाऱ्यासह अनेक पोलिओ अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. (वृत्तसंस्था)
४परिषदेचे समन्वयक मौलाना झियाउल हक नक्षबंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ मे रोजीचा शुक्रवार हा शांतता व प्रेमाचा दिवस म्हणून जाहीर केला असून, या दिवशी ४ लाख मशिदीत हत्या व दहशतवादी कृत्याविरोधात प्रवचने दिली जातील.