Storm Eunice: लाखो घरांची बत्ती गुल; युकेमध्ये यूनिस चक्रीवादळाचा कहर; ब्रिटन, आयर्लंडला सर्वाधिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 18:11 IST2022-02-19T18:10:35+5:302022-02-19T18:11:01+5:30
हवामान खात्याने सांगितले की, शुक्रवारी व्हाईट आयलँडवर वाऱ्याचा वेग ताशी 122 मैल इतका नोंदवला गेला. इंग्लंडमध्ये नोंदवलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे.

Storm Eunice: लाखो घरांची बत्ती गुल; युकेमध्ये यूनिस चक्रीवादळाचा कहर; ब्रिटन, आयर्लंडला सर्वाधिक फटका
युनायटेड किंगडमध्ये सध्या युनिस वादळाने कहर केला आहे. यामुळे लाखो लोकांना अंधारात रहावे लागत आहे. ब्रिटन आणि आर्यलंडला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले असून वादळ शमल्य़ानंतर साफसफाई, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या वादळात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान खात्याने सांगितले की, शुक्रवारी व्हाईट आयलँडवर वाऱ्याचा वेग ताशी 122 मैल इतका नोंदवला गेला. इंग्लंडमध्ये नोंदवलेले सर्वात शक्तिशाली वादळ आहे. 32 वर्षांपूर्वी बर्न्स डे स्टॉर्मनंतर युनायटेड किंग्डमला धडकणारे चक्रीवादळ युनिस हे सर्वात वाईट वादळ असल्याचे हवामान खात्याने वर्णन केले आहे. बर्न्स डे वादळात 47 जणांचा मृत्यू झाला होता.
शुक्रवारी संध्याकाळी यूकेमधील सुमारे 435,000 घरांमध्ये वीज गेली. शेकडो रेल्वे सेवा आणि उड्डाणे रद्द करण्यात आली आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. हवामान खात्याने लाखो लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले होते. वाहतूक सेवा बंद असल्याने लोकांना प्रवासही करता आला नाही.
नॅशनल रेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "दिवसभर व्यत्ययांसह, शनिवारी सकाळी ग्रेट ब्रिटनचे बहुतेक मार्ग प्रभावित झाले." प्रवाशांना दक्षिण, थेम्सलिंक आणि ग्रेट नॉर्दर्न नेटवर्कसह इतर विविध मार्गांवर प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला. दुपारपर्यंत हे मार्ग खुले होणे अपेक्षित आहे.