"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 08:44 IST2025-10-13T08:43:34+5:302025-10-13T08:44:10+5:30
Russia-Ukraine War: एका खाजगी कार्यक्रमातील ऑडिओ रेकॉर्डिंगमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंतची सर्वात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना थेट इशारा दिला आहे की, जर युक्रेनमधील युद्ध लवकर संपवले नाही, तर अमेरिका मॉस्कोवर हल्ला करण्यासाठी युक्रेनला लांब पल्ल्याची खतरनाक क्षेपणास्त्रे देऊ शकते. एका निधी संकलन कार्यक्रमादरम्यान केलेल्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एका खाजगी कार्यक्रमातील ऑडिओ रेकॉर्डिंगमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक विधानामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी युक्रेनला 'टॉमहॉक'सारखी शक्तिशाली आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे देण्याचे संकेत दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "जर हे युद्ध लवकर मिटले नाही, तर मी युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्रे पाठवू शकेन." टॉमहॉक क्षेपणास्त्रांची मारा करण्याची क्षमता प्रचंड असून ती रशियाच्या आतपर्यंत मारा करू शकतात. अमेरिकेच्या या पवित्र्यानंतर रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली असून, याला 'आक्रमकतेचे नवीन पाऊल' म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल का?
राष्ट्राध्यक्ष पदावर परतल्यानंतर सुरुवातीला ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला होता. मात्र, रशियाच्या भूमिकेमुळे ते निराश झाले असून, आता त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी हे संकेत दिले आहेत. युक्रेनला शक्तिशाली शस्त्रे मिळाल्यास रशियावर शांतता वाटाघाटीसाठी दबाव वाढेल, असे मानले जात आहे. एकंदरीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमक्यांमुळे युक्रेन युद्धाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, जागतिक महासत्तांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.