हल्ले थांबवा! निष्पाप लोकांना वाचवा; पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:07 PM2023-10-30T13:07:33+5:302023-10-30T13:08:04+5:30

इंग्लंड, अमेरिकेत नागरिक रस्त्यांवर

Stop the attacks! Save the innocent people; Demonstrations in support of Palestinian citizens | हल्ले थांबवा! निष्पाप लोकांना वाचवा; पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ निदर्शने

हल्ले थांबवा! निष्पाप लोकांना वाचवा; पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ निदर्शने

लंडन : मागील २३ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हजारो निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. गाझापट्टीत सलग होणाऱ्या बॉम्बहल्ल्यांमुळे लाखो लोक मृत्यूच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून इस्रायलने तातडीने बॉम्बहल्ले थांबवावे, या मागणीसाठी आणि निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ जगभरातील प्रमुख शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. लंडनमध्ये तर जवळपास पाच लाख नागरिकांनी मोर्चा काढला. त्याशिवाय, न्यूयॉर्क, रोम, बर्लिनसह अनेक शहरांमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले.

आठ हजारांवर मृत्यू

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ८,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. यात ३,३०० पेक्षा अधिक मुलांचा समावेश आहे.

इराणचा इस्रायलला इशारा

  1. गाझापट्टीवर बॉम्बफेक न थांबविल्यास ‘अनेक आघाड्यांवर’ परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने इस्रायलला दिला. इराण युद्धात उतरल्यास काय करायचे याचा विचार अमेरिका करीत आहे.
  2. इराणबाबत इस्रायलची भूमिका कोणतीही तडजोड करण्याची नाही. गाझा युद्धात इराणचा संभाव्य प्रवेश शत्रूंमधील वैमनस्याचा नवा अध्याय उघडेल आणि युद्ध थेट इराणच्या दारात नेईल.


त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे...

एकाही देशाने युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घेतला नाही, हे आश्चर्यजनक आहे. पॅलेस्टिनींनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे लंडनमधील निदर्शक म्हणाले.

अमेरिकेत केली शस्त्रसंधीची मागणी

  • पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, लॉस एन्जेलिस येथे मोर्चा काढत इस्रायलने युद्ध थांबवावे, असे सांगत शस्त्रसंधीची मागणी केली. यावेळी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
  • २३ लाख लोकांचा जगाशी संपर्क तुटला : इस्रायलने गाझापट्टीमध्ये इंटरनेट आणि इतर संवाद साधण्याची माध्यमे बंद केली आहेत. यामुळे २३ लाख लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. त्यांच्या मदतीसाठी इलॉन मस्क यांनी इंटरनेट सेवा उपलब्ध केली.


या शहरांमध्येही निघाले मोर्चे

  • रोम येथील ऐतिहासिक कॉलोसियमजवळ हजारो नागरिक एकत्र आले. बर्लिनमध्येही फलक हाती घेत इस्रायलचा निषेध केला
  • पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले. इराकमध्ये बगदाद, हेब्रोन येथेही निदर्शने केली.
  • स्पेनमधील विविध शहरांमध्ये झालेल्या निषेध मोर्चांमध्ये इस्रायलचा निषेध करण्यात आला.
  • न्यूझीलँडची राजधानी वेलिंग्टनमध्येही फ्री-पॅलेस्टाइनचे फलक हाती घेत निदर्शने केली.


‘ऋषी सुनक यांनी दबाव आणावा’

  • लंडनमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ विशाल मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कार्यालयामार्गे हा मोर्चा संसदेजवळ संपला. 
  • यावेळी गाझापट्टीवरील हल्ले तातडीने थांबवावे आणि पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करावी, असा दबाव सुनक यांनी इस्रायलवर आणावा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Stop the attacks! Save the innocent people; Demonstrations in support of Palestinian citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.