ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 21:13 IST2025-02-21T21:10:45+5:302025-02-21T21:13:23+5:30
अमेरिका युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे.

ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार
Russia-Ukraine War : दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-यु्क्रेन युद्ध अंतिम टप्प्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असून, यासाठी त्यांनी रशियासोबत चर्चाही सुरू केली आहे. पण, दुसरीकडे युक्रेनचा याला विरोध आहे. अमेरिका एका बाजूनेच निर्णय घेत असल्याचा आरोप युक्रेनचा आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकाही युक्रेनवर सातत्याने दबाव टाकत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दिलेल्या वक्तव्यावरुन अमेरिकेने त्यांची कोंडी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांनी म्हटले की, युक्रेन हे विसरत आहे की, त्यांना अमेरिकेसोबत 500 अब्ज डॉलर्स (सुमारे 5 लाख कोटी रुपये) च्या खनिज करारावर स्वाक्षरी करायची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात विधाने करून काही उपयोग होणार नाही. युक्रेनने ट्रम्प यांचे म्हणणे मान्य करून तडजोड करावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेनने करारावर स्वाक्षरी न केल्यास, आम्ही पुढील योजनांबाबत बोलू, असेही वॉल्ट्झ यांनी म्हटले आहे.
ट्रम्प सतत दबाव टाकत आहेत
अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी झेलेन्स्की यांना हुकूमशहा म्हटले होते. ट्रम्प म्हणाले होते की, झेलेन्स्की युक्रेनमध्ये निवडणुका घेत नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने सत्तेवर बसले आहेत. ट्रम्प यांनी झेलेंक्सी यांचे अलोकप्रिय नेते, असेही वर्णन केले आहे. दुसरीकडे, झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याविरोधात आघाडी उघडताना त्यांना लबाड म्हटले. युक्रेन आणि रशिया यांच्यात लवकरच शांतता करार व्हावा यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र आम्हाला विश्वास घेत नाहीत, असा आरोप युक्रेनचा आहे. पण, या करारासाठी ट्रम्प, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर सातत्याने दबाव आणत आहेत.
युक्रेनला काय हवे आहे?
2014 पूर्वी रशियाच्या ताब्यात असलेला क्रिमिया युक्रेनला परत हवा आहे. याशिवाय, युक्रेनला युद्धादरम्यान रशियाने ताब्यात घेतलेले भागही परत हवे आहेत. याशिवाय, युक्रेनला लष्करी सरावावरही निर्बंध नको आहेत. युक्रेनच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता नाही, त्यामुळे आता पुढे ट्रम्प आणि पुतिन काय पाऊल टाकतात, हे पाहणे महत्वाचे आहे.