श्रीलंका: महिंदा राजपक्षेंना पराभवाचा धक्का
By Admin | Updated: January 9, 2015 15:12 IST2015-01-09T10:08:44+5:302015-01-09T15:12:23+5:30
श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचा पराभव झाला असून मैत्रिपाला सिरिसेना हे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष असतील.

श्रीलंका: महिंदा राजपक्षेंना पराभवाचा धक्का
>ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. ९ - श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीदरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी स्वत:चा पराभव मान्य केला आहे. शुक्रवार सकाळपासूनच निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली असून राजपाक्षे यांचेच एकेकाळचे मित्र असलेले मैत्रीपाला सिरीसेना यांचा विजय निश्चित समजला आहे. जनतेच्या आदेशाचा आदर राखत राजपक्षे यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान सोडले आहे, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली. विरोधी पक्षाचे नेते मैथ्रीपाल सिरिसेना यांनी राजपक्षेंविरुद्ध आघाडी घेतल्याचे दिसून आले. निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप घोषित झाला नसला तरीही सिरिसेना यांचा ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुस्लिम व तामिळबहुल भागात मतदानाचे प्रमाण विलक्षण राहिल्यामुळे ही निवडणूक राजपाक्षेंसाठी कठीण बनली होती असे बोलले जात आहे. देशातील सत्तांतर कोणत्याही "अडचणीशिवाय‘ होईल, असे आश्वासन राजपक्षे यांनी दिले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिरिसेना यांचे अभिनंदन केले आहे. श्रीलंकेतील शांती व विकासासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाहीही पंतप्रधानांनी सिरिसेना यांना दिली.