Sri Lanka Crisis: चीन नाही, अखेर भारतच श्रीलंकेच्या मदतीला धावला; अन्नधान्याचे ट्रकचे ट्रक लोड होतायत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:17 IST2022-04-02T14:17:27+5:302022-04-02T14:17:56+5:30
Sri Lanka Crisis India help: श्रीलंकेत सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. एक किलो तांदळासाठी लोकांना पाचशे श्रीलंकन रुपये मोजावे लागतात आणि साखरेच्या बाबतीतही तेच आहे. फळे आणि भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. भाज्यांचे भाव हजारो रुपयांवर पोहोचले आहेत.

Sri Lanka Crisis: चीन नाही, अखेर भारतच श्रीलंकेच्या मदतीला धावला; अन्नधान्याचे ट्रकचे ट्रक लोड होतायत
गेल्या काही काळापासून श्रीलंका, नेपाळसारख्या देशांना भारतापासून तोडण्यासाठी चीन मोठमोठी मदत करण्याची आश्वासने देत होता. ही मदत नव्हती तर ते कर्ज होते. त्या कर्जाच्या खाईत एकदा का हे देश आले की त्यांची पाकिस्तानसारखी अवस्था करायची आणि आपल्या तालावर नाचवायचे हा चीनचा इरादा होता. श्रीलंकेला वेळोवेळी भारतानेच मदत केली होती. तेथील लष्करी मदत असो की कोणत्या नैसर्गिक संकटातील मदत असो, भारत नेहमीच त्यांच्या मदतीला गेला आहे.
Sri Lanka Crisis: सोन्याची लंका महागाईत कोणी जाळली, व्हिलन कोण?; चार भावांनी केले कंगाल
सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. लोकांना अन्नधान्य मिळत नाहीय. तेथील चलन आता कचरा झाले आहे. मोठमोठी रक्कम मोजूनही लोकांना वस्तू खरेदी करता येत नाहीएत. तर अनेकांकडील पैसे संपत आलेत. उपाशीपोटी रहावे लागत आहे. अशावेळी भारताने मदतीचा मोठा हात देऊ केला आहे.
श्रीलंकेतील लोकांना पाठविण्यासाठी भारतात व्यापाऱ्यांनी ट्रकचे ट्रक लोड करण्यास सुरुवात केली आहे. ४० हजार टन तांदूळ भरला जात आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री गेल्याच आठवड्यात श्रीलंकेला गेले होते. तेथे त्यांनी १अब्ज डॉलरची क्रेडिट लाईन देण्याचे आश्वासन दिले होते. भारतात येताच त्यातील पहिली मदत देण्याची तयारी सुरु केली आहे.
श्रीलंकेमध्ये मोठा सण साजरा केला जाणार आहे, त्या आधीच ही मदत तिथे पोहोचविली जाणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तेथील सरकारने आणीबाणी लादली आहे. याचबरोबर दुसऱ्या देशांकडून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी भारत श्रीलंकेला पैशांच्या बाबतीतही मदत करणार आहे. भारताने पाठविलेला तांदूळ पोहोचला की तेथील तांदळाचे जे दुप्पट-तिप्पट झालेले दर कमी होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेत सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. एक किलो तांदळासाठी लोकांना पाचशे श्रीलंकन रुपये मोजावे लागतात आणि साखरेच्या बाबतीतही तेच आहे. फळे आणि भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. भाज्यांचे भाव हजारो रुपयांवर पोहोचले आहेत.