न्यायालयाचा महिंदा राजपक्षेंना धक्का, पंतप्रधान म्हणून काम करण्यास स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:59 IST2018-12-03T19:58:25+5:302018-12-03T19:59:25+5:30
श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

न्यायालयाचा महिंदा राजपक्षेंना धक्का, पंतप्रधान म्हणून काम करण्यास स्थगिती
कोलंबो - श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काम करण्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेमधील राजकीय संकट अधिकच गहिरे झाले आहे.
न्यायालयाचा हा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. सिरिसेना यांनीच रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून दूर करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या या वादग्रस्त सरकाराविरोधात 122 खासदारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हा निर्णय दिला. आता या प्रकरणाची सुनावणी 12 आणि 13 डिसेंबर रोजी होणार आहे.
AFP: Sri Lanka court denies Mahinda Rajapaksa authority to act as Prime Minister. (file pic) pic.twitter.com/rntpb5uX29
— ANI (@ANI) December 3, 2018
राजपक्षे यांच्या पंतप्रधान बनण्याविरोधात विक्रमसिंघेंच्या युनायटेड नॅशनल पार्टी, जनता विमुक्ती पेरामुना आणि तामिळ नॅशनल अलायन्स या पक्षांना अपिलीय न्यायालयात धाव घेतली होती. श्रीलंकेमध्ये 26 ऑक्टोबर रोजी राजकीय संकटाची सुरुवात झाली होता. त्यावेळी राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. तसेच सिरिसेना यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी 20 महिने आधीच संसद भंग करण्याची घोषणा करून निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने संसद भंग करण्याचा सिरिसेना यांचा निर्णय रद्द ठरवून मध्यावधी निवडणुका घेण्याच्या तयारीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून श्रीलंकेमध्ये विक्रमसिंघे आणि राजपक्षे हे दोघेही पंतप्रधान असल्याचा दावा करत आहेत.