अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारविषयी तेथील जनतेच्या मनात भयानक भीती आहे. त्यांनाच काय, अख्ख्या जगाच्या मनात त्यांच्याबद्दल साशंकता आहे. कारण, हे तालिबानी केव्हा काय करतील याचा काहीच भरवसा नाही. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये असतानाच्या काळातही तालिबान्यांनी त्यांच्या नाकीनऊ आणले होते.
तालिबान्यांच्या क्रूर राजवटीमुळे तेथील जनता भयभीत आहे, पण आता तालिबानी सरकारच पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याचं कारण तालिबान्यांच्या दोन सत्तास्थानांमध्ये सुरू झालेली सुंदोपसुंदी! तालिबान सरकारमध्ये दोन प्रमुख गट आहेत. पहिला गट आहे सुप्रीम लीडर हिबतुल्लाह अखुंदजादा यांचा आणि दुसरा गट आहे गृहमंत्री हक्कानी यांचा. या दोन्ही ‘खुंखार’ गटात आता फूट पडली आहे आणि ते आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटांना एकमेकांपासून भीती वाटते आहे आणि दुसरा गट आपल्याला संपवून सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतील का, अशी शंका प्रत्येक गटाला वाटते आहे. अफगाणिस्तानातील इंटरनेट बंदीच्या मुद्द्यावरून त्यांच्यातील अंतर्गत फूट उघड झाली आणि त्यांच्यातील धुसफूस चव्हाट्यावर आली.
सत्तेसाठी सुरू असलेली ओढाताण आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार अलीकडेच व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमधून हे मतभेद जगजाहीर झाले.
सुप्रीम लीडर हिबतुल्लाह अखुंदजादा कंदहारमधील एका मदरशामध्ये आपल्या भाषणात म्हणाले, सरकारमधील लोकच एकमेकांशी संघर्ष करत आहेत. हे अंतर्गत मतभेद असेच वाढत राहिले, तर तालिबान सरकार कोसळेल आणि संपुष्टात येईल. तालिबान्यांतच तीव्र मतभेद असल्याच्या चर्चांना आणि अफवांना यामुळे अधिक बळ मिळालं. तालिबाननं मात्र नेहमीच हे मतभेद नाकारले आहेत.
पहिला गट पूर्णपणे अखुंदजादांप्रती निष्ठावान आहे. हा गट कंदहारमधून काम करतो आणि जगापासून अलिप्त राहून अफगाणिस्तानला एक कठोर इस्लामिक देश बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरा गट राजधानी काबुलमध्ये कार्यरत आहे. सिराजुद्दीन हक्कानी यांचा हा गट इस्लामची कठोर व्याख्या मान्य करतो, पण अफगाणिस्ताननं जगाशी जोडलेलं राहावं, अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि मुली व महिलांना किमान शिक्षणाचा अधिकार मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.
सप्टेंबर २०२५च्या अखेरीस इंटरनेट बंदीवरून या दोन्ही गटांतील अंतर्गत लढाई अधिक स्पष्टपणे समोर आली. सुप्रीम लीडर अखुंदजादांनी संपूर्ण तालिबानात इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देश अक्षरशः जगापासून तुटला. तीन दिवसांनंतर कोणतंही अधिकृत कारण न देता संपूर्ण देशात अचानक इंटरनेट पुन्हा सुरू झालं. तालिबानमधील अंतर्गत सूत्रांनुसार, काबुल गटानं अखुंदजादांच्या आदेशाला न जुमानता इंटरनेट पुन्हा सुरू केलं.
या घटनेनंतर पुढे काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली. काहींच्या मते काबुलमध्ये बसलेल्या तालिबान नेत्यांना हळूहळू सत्तेबाहेर ढकललं जाऊ शकतं. तर काहींचं म्हणणं होतं की, अखुंदजादांनी पाऊल मागे घेतलं, कारण त्यांना अंतर्गत बंड उसळण्याची भीती वाटत होती. तालिबाननं मात्र या सर्व अटकळी फेटाळून लावल्या आहेत.
Web Summary : Taliban faces internal conflict between hardliners and pragmatists over governance and global engagement. Disagreements over internet access exposed deep divisions, sparking fears of potential collapse and power struggles.
Web Summary : तालिबान में कट्टरपंथी और व्यावहारिक गुटों के बीच शासन और वैश्विक भागीदारी को लेकर आंतरिक संघर्ष है। इंटरनेट पहुंच पर असहमति ने गहरे मतभेदों को उजागर किया, जिससे पतन और सत्ता संघर्ष का डर बढ़ गया।