विशेष लेख: ट्रम्प, थर्ड जेंडर आणि 'सारा'ची अमेरिकन गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:32 IST2025-02-01T09:32:51+5:302025-02-01T09:32:51+5:30
अमेरिकेला शिंक आली की जगाला ताप येतो. पारलिंगी व्यक्तींना 'पुसून टाकण्या'चा डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट जगाला 'मागे' घेऊन जाऊ नये, म्हणजे झाले!

विशेष लेख: ट्रम्प, थर्ड जेंडर आणि 'सारा'ची अमेरिकन गोष्ट
समीर समुद्र, समलिंगी चळवळीतील अमेरिकास्थित कार्यकर्ते |
महिनाभरापूर्वी सारा घरी आली होती जेवायला. ३६ वर्षांच्या साराला भारतीय जेवण प्रचंड आवडते. त्यामुळे आमचे वरचेवर भेटणे होत असते. सहा वर्ष अमेरिकेच्या सैन्यात काम केल्याने साराकडून खूप काही ऐकायला मिळते. सैन्यात असताना सारा एक रुबाबदार पुरुष सॅम होती. पिळदार देहयष्टी, निळे डोळे, भारदस्त व्यक्तिमत्त्व अमेरिकन सैन्यात एकदम शोभून दिसणारे व्यक्तिमत्त्व. साराला स्वतःच्या ट्रान्सजेंडर असल्याची जाणीव लहानपणापासूनच होती; परंतु समाजाच्या भीतीने आणि सैन्यातल्या वातावरणामुळे तिने ते कधीच उघडपणे जगासमोर आणले नाही. नंतर मात्र तिला जाणवले की आपण आपले आयुष्य असे लपतछपत नाही जगू शकत. चार वर्षापूर्वी साराने लिंगबदलाच्या वैद्यकीय प्रवासाला सुरुवात केली आणि तिला आयुष्यात पहिल्यांदा 'खरेपणाने जगणे' म्हणजे काय असते हे कळायला लागले. अमित (माझा जोडीदार) आणि मी साराच्या ह्या बदलांचे जवळचे साक्षीदार आहोत. आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सारासारख्या अनेक ट्रान्सजेंडर आणि नॉन- बायनरी व्यक्तींचे आयुष्य पुसून टाकायचा चंग बांधला आहे. अमेरिकेत यापुढे 'स्त्री' आणि 'पुरुष' अशा दोनच लिंग-ओळखी अधिकृत मानल्या जातील, असतील, अशी वल्गना करून ट्रम्प महाशयांनी नवा अजेंडा राबवायला घेतला आहे. अशा निर्णयांचे वैयक्तिक आयुष्यावर किती सखोल परिणाम होतात, ते साराशी बोलताना जाणवते. देशासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता सारा लढली होती; पण त्याच देशाच्या सरकारने आता तिचे अस्तित्वच अमान्य केले आहे. तिला लिंगबदलासाठी वैद्यकीय विम्याचे कवच आहे, आता ह्या नवीन निर्णयामुळे तिच्या पुढच्या शस्त्रक्रियांसाठी ते कवच उपलब्ध असेल की नाही हे माहीत नाही. सरकारी कागदपत्रांवर 'ट्रान्सजेंडर' ही तिची ओळख पुसून परत तिच्या जन्माच्या वेळेस जे लिंग 'असाइन' केले होते, ते लिहिले जाईल. खूप धीर एकवटून एक स्त्री म्हणून नवी ओळख घेऊन जगासमोर आलेली सारा परत 'आयडेंटिटी क्रायसिस'च्या चक्रव्यूहात अडकणार आहे. तिचे आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी या सर्वांनी मोठ्या प्रयत्नाने तिला तिच्या खऱ्या स्वरूपात स्वीकारले होते, त्यांनाही पुन्हा एका नव्या भावनिक आंदोलनातून जावे लागणार आहे.
अमेरिकेत आज साधारणतः १६ लाख लोक जे स्वतःला ट्रान्सजेंडर किंवा नॉन-बायनरी म्हणून संबोधतात. ही सगळी तुमच्या आमच्या सारखी माणसे आहेत, ज्यांना भावना आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत, स्वप्ने आहेत. ह्या सगळ्या लोकांना फक्त एक गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे समाजाने त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारावे. परंतु कडव्या धार्मिक विचारसरणीच्या आणि प्रतिगामी विचारांच्या राजकीय नेतृत्वामुळे समाजाच्या एका समूहाला त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित राहावे लागणार आहे.
प्रदीर्घ संघर्ष आणि कायदेशीर लढ्यांनंतर LGBTQ समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायद्यात बदल झाले आणि हळूहळू समाजमन बदलायला लागले आहे. हा लढा नवीन जोमाने चालू करावा लागणार आहे. अर्थात अमेरिकेत आम्ही LGBTQ कार्यकर्ते यासाठी गेले २-३ महिने तयारी करायला लागलो होतो, कारण ट्रम्प यांच्याकडून वेगळी अपेक्षा नव्हती. ट्रम्प यांच्या या निर्णयाला वेगवेगळ्या संघटनांकडून कोर्टात आव्हान दिले जाईल, त्यासाठी अमेरिकन घटनेचा आधार घेतला जाईलच. विद्यापीठे, बड्या कंपन्या, विमा कंपन्या, वैद्यकीय क्षेत्र आदी सारे या निर्णयाला विरोध करतात की कातडीबचावू धोरण घेऊन सरकारच्या होला हो करतात, हे लवकरच कळेल. एकंदरीतच परत एकदा ह्या विषयावर घुसळण होणार आहे हे निश्चित. अमेरिकेला शिंक आली की जगाला ताप येतो,
असे म्हणतात. अजूनही थोड्याफार फरकाने हे खरे आहे. आजच्या जागतिक व्यवस्थेत आपण सगळेच एकमेकांशी जोडलेलो आहोत. भारतात २०२४ मध्ये पारलिंगी व्यक्तींना हक्क मिळाले. अर्थात अजूनही आपल्याकडे LGBTQ समुदायाचे दैनंदिन आयुष्य सुखकर होण्यासाठी खूप प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या ह्या नवीन धोरणामुळे जागतिक पातळीवर ह्या विषयावर परत एकदा उलटा प्रवाह वाहणार नाही हे बघणे खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना एकत्र येऊन काम करावे लागेल. एका प्रबळ देशाच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्याच्या पुढे न झुकता कणखरपणे, संघटित होऊन, मानवी हक्कांच्या लढ्यासाठी मार्गक्रमण करणे अपेक्षित आहे. या लढ्यात भारताला आपला वाटा उचलावा लागेल. भारताच्या प्राचीन संस्कृतीत लैंगिक विविधतेला केवळ स्थानच नाही तर महत्त्व आहे. भारत विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे असे जर आपण म्हणत असू तर खरोखर आपल्या संस्कृतीच्या ह्या नैसर्गिक पैलूची ओळख जगाला करून द्यायला हवी.
सारा आणि LGBTQ समुदायातले मित्र यांना एकच सांगावेसे वाटते... 'ये सफर बहोत हैं कठीन मगर, ना उदास हो मेरे हमसफर'.
sdsamudra@hotmail.com