अंतराळातल्या कचऱ्यासाठी नवी ‘घंटागाडी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 08:00 AM2022-07-14T08:00:10+5:302022-07-14T08:00:45+5:30

अंतराळात जाणाऱ्या लोकांची संख्याही आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि अंतराळातील कचऱ्याचे ढीगही वाढू लागले आहेत. 

spacial article on waste collection in space | अंतराळातल्या कचऱ्यासाठी नवी ‘घंटागाडी’!

अंतराळातल्या कचऱ्यासाठी नवी ‘घंटागाडी’!

Next

आपल्या घरातला कचरा आपण रोज कुठे टाकतो? - पूर्वी घरातला कचरा फेकण्यासाठी गल्लोगल्ली कचऱ्याची कुंडी असायची. आजही अनेक ठिकाणी ती दिसते. अलीकडे अनेक शहरांत आपल्या घरातला कचरा नेण्यासाठी घंटागाड्या आपल्या दाराशी येतात. त्यात आपण कचरा टाकतो. नंतर हा कचरा शहराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी टाकला जातो; पण तिथे राहणारी लोकही हा कचरा आमच्या परिसरात नको म्हणून आंदोलनं, विरोध करू लागले आहेत. या कचऱ्याचं प्रमाण इतकं वाढत चाललं आहे, की हा कचरा टाकायचा तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यावरून अनेक ठिकाणी भांडणंही होऊ लागली आहेत. हा कचरा आणि ही भांडणं येत्या काळात सगळ्यांसाठीच मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. हे झालं पृथ्वीवरचं, पण अंतराळातल्या कचऱ्याचं काय, अंतराळात जाणाऱ्या लोकांची संख्याही आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि अंतराळातील कचऱ्याचे ढीगही वाढू लागले आहेत. 

अंतराळातील स्पेस स्टेशन हे संशोधकांचं घर. तिथे ते राहतात, खातात, पितात, काम करतात. त्यातूनही अनेक प्रकारचा कचरा निर्माण होतो. अर्थातच संशोधकांकडून झालेला हा कचरा इतस्तत: कुठेही टाकला जात नाही. अंतराळ स्थानकातच हा कचरा एका ठिकाणी साठवला जातो; पण या कचऱ्याला तरी किती जागा पुरणार? कचरा साठवणार किती? हा कचरा जातो कुठे? - या कचऱ्याच्या बॅगा नंतर विशेष अंतराळ यानाच्या साहाय्यानं पृथ्वीच्या दिशेनं पाठवणं हा इथला शिरस्ता आहे; पण आता यावरही संशोधकांनी नवा, अत्याधुनिक उपाय शोधला आहे. 

आता काही दिवसांपूर्वीच संशोधकांनी कचऱ्याची एक बॅग पृथ्वीच्या दिशेनं पाठविली आहे. त्यासाठी त्यांनी एका विशेष ट्रॅश बॅगची निर्मिती केली आहे. नासाचं जॉन्सन स्पेस सेंटर आणि नॅनोरॉक्स या खासगी कंपनीनं मिळून ही खास ट्रॅश बॅग तयार केली आहे.  या बॅगमध्ये एकूण ७८ किलो कचरा भरण्यात आलेला आहे. हार्वर्ड स्मिथसोनियस सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्सचे अंतराळ संशोधक आणि अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल यांनी यासंदर्भात एका ट्वीटद्वारे सांगितलं की, या ट्रॅश बॅगमध्ये २५० किलो कचरा साठवला जाऊ शकतो. दीड मीटर लांबीची ही बॅग आहे.

नॅनोरॉक्स या कंपनीच्या मते विशेष प्रकारच्या मटेरिअलच्या साहाय्यानं ही बॅग तयार करण्यात आली आहे. या बॅगमध्ये संशोधकांचे कपडे, त्यांच्या रोजच्या वापरातले आणि आता निरुपयोगी झालेले अनेक घटक, पॅकिंग मटेरियल, त्यांच्या ऑफिसचं सामान.. अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. कचरा घेऊन अंतराळातून ही बॅग प्रवासाला निघाली असली तरी ती पृथ्वीच्या वातावणात कधी पोहोचेल याविषयीची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. या बॅगचा अंतराळातला प्रवास मात्र ट्रॅक केला जात आहे. 

याआधी अंतराळ स्थानकातील क्रू मेंबर्स त्यांना शक्य तेवढा सगळा कचरा एका ठिकाणी साठवून ठेवत असत. हा कचरा नेण्यासाठी ‘कार्गो शिप’ची ते वाट पाहत. त्यानंतर त्यात हा कचरा भरून पृथ्वीच्या दिशेनं तो पाठवला जात असे. वातावरणातील घर्षणामुळे यातील बराचसा कचरा जळून जात असे. आताची पद्धत मात्र अधिक चांगली, अधिक किफायतशीर आहे. 

अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल यांच्या म्हणण्यानुसार अंतराळातील कचरा ट्रॅशबॅगमध्ये भरून पृथ्वीकडे पाठवणं ही नवी गोष्ट नाही. १९७० आणि १९८० च्या काळात रशियन स्पेस स्टेशनमधील कचरा एका बॅगमध्ये भरून तो पृथ्वीच्या दिशेनं फेकला जायचा. सगळ्यात शेवटची कचरा बॅग रशियाच्या मीर स्पेस स्टेशनमधून सप्टेंबर १९९६ मध्ये पृथ्वीच्या दिशेनं फेकण्यात आली होती. ही बॅग सुमारे दोन वर्षांनी म्हणजे १९९८ मध्ये पृथ्वीच्या वातावरणात पोहोचली होती. अंतराळातील नव्या ‘घंटागाडी’नं पाठवलेला हा कचरा वातावरणात कधी पोहोचतो, याकडे आता संशोधकांचं लक्ष आहे.

अंतराळातला कचरा किती?
अंतराळात गेलेले चार अंतराळवीर वर्षाला सरासरी २५०० किलो कचरा करू शकतात. याशिवाय अंतराळात इतरही कचरा आहेच. त्यात कित्येक वर्षे जुन्या आणि निरुपयोगी झालेल्या कृत्रिम उपग्रहांचे तुकडे, स्पेस रॉकेट इत्यादींचा समावेश आहे. त्यांचा वेग ताशी ५०.००० किलोमीटरपर्यंत आहे. त्यातला एखादा तरी तुकडा रोज पृथ्वीवर पडतो. अंतराळात तर हा कचरा वाढतोच आहे, पण त्याचा अधिकाधिक भार आता पृथ्वीलाही सोसावा लागतोय.

Web Title: spacial article on waste collection in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.