दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ली जे म्योंग यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट घेतली. दोन्ही देशांमधील गंभीर मुद्द्यांवर चर्चा होणार असताना, ली यांनी आपल्या खास शैलीत ट्रम्प यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विनोदी टिप्पणी करत म्हटले, "मला आशा आहे की तुम्ही उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना भेटाल आणि तिथे एक ट्रम्प टॉवर बांधला जाईल, जिथे आपण एकत्र गोल्फ खेळू."
ली यांनी जिंकले ट्रम्प यांचे मन!या भेटीत ली यांनी ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाची आणि उत्तर कोरियासोबतच्या त्यांच्या भेटींची प्रशंसा केली. "जगाची प्रगती फक्त तुमच्यासारखे नेतेच घडवून आणू शकतात. तुम्ही जर पीसमेकर बनलात, तर मी तुमच्यासोबत पेसमेकर म्हणून काम करेन," असे ते म्हणाले. त्यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधील सजावटीचेही कौतुक केले आणि अमेरिकेच्या नवीन समृद्धीचे आणि उज्ज्वल भविष्याचे ते प्रतीक असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनीही ली यांना निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आणि "आम्ही १०० टक्के तुमच्यासोबत आहोत," असे आश्वासन दिले.
पुन्हा किम जोंग उन यांना भेटण्याची ट्रम्प यांची इच्छाट्रम्प यांनी भविष्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, त्यांच्या जुन्या भेटींमध्ये दोघांचे चांगले संबंध तयार झाले होते. मात्र, याचदरम्यान उत्तर कोरियाने नवीन हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची चाचणी केली आणि दक्षिण कोरियासोबतची चर्चा नाकारली आहे. भेटीच्या शेवटी, ली यांनी ट्रम्प यांना गोल्फ पटर, 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' लिहिलेल्या दोन काउबॉय हॅट्स आणि एका कासवाच्या जहाजाची (टर्टल शिप) प्रतिकृती भेट दिली.
मुख्य मुद्द्यांवर सहमती नाही!या भेटीत सौहार्दपूर्ण वातावरण असले तरी, संरक्षण खर्च, अमेरिकन सैन्याची तैनाती आणि आयात शुल्क (टॅरिफ) यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर कोणतीही ठोस सहमती होऊ शकली नाही. दक्षिण कोरियाच्या कंपन्या अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. कोरियन एअरने १०३ बोईंग विमाने खरेदी करण्याचा मोठा करार केला आहे आणि ह्युंडईनेही गुंतवणूक वाढवण्याची घोषणा केली आहे. असे असूनही, दक्षिण कोरियाच्या वस्तूंवर १५% टॅरिफ कायम आहे आणि ट्रम्प यांनी ते कमी करणे सोपे नाही, असे संकेत दिले. ली यांनी ट्रम्प यांना सांगितले की, उत्तर कोरिया दरवर्षी १० ते २० नवीन अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता मिळवत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही कबूल केले आहे की, प्योंगयांग आता हायपरसोनिक आणि मल्टी-वॉरहेड क्षेपणास्त्रांच्या निर्मितीकडे वाटचाल करत आहे.