इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:00 IST2026-04-11T07:57:33+5:302026-04-11T08:00:17+5:30
इराण युद्धाने गाझा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राधान्यातून मागे पडला आहे

इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
दायर अल-बलाह (गाझा पट्टी : गाझातील युद्धविरामाला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले. गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम झाला होता. त्यानंतर इस्रायलचे हवाई हल्ले वा अन्य लष्करी कारवायांची संख्या व बॉम्बस्फोटांचे आवाज कमी झाले असला, तरी गाझातील २० लाख नागरिक आजही तंबूंमध्ये आणि उद्ध्वस्त इमारतींमध्ये राहत आहेत. इस्रायलचे अधूनमधून गाझावर हल्ले सुरू आहेत पण इराण युद्धाने गाझा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राधान्यातून मागे पडला आहे.
ट्रम्प यांचे महत्त्वाकांक्षी ‘बोर्ड ऑफ पीस’ रखडले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ अब्ज डॉलर्सच्या निधीसह ‘बोर्ड ऑफ पीस’ स्थापन केला होता. पण इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून या बोर्डाची एकही बैठक झालेली नाही.
- हमासचे नि:शस्त्रीकरण: हमासने नि:शस्त्रीकरणाच्या प्रस्तावावर अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.
- मध्यस्थांचे दुर्लक्ष: कतार व इजिप्त गाझाऐवजी इराण युद्धाला विराम म्हणून वाटाघाटी घडवून आणण्यात व आर्थिक नुकसान सावरण्यात व्यग्र आहेत.
ग्राउंड रिपोर्ट
- मदतीचा अभाव : मार्चमध्ये गाझात जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकची संख्या ८० टक्क्यांनी घटली आहे.
- मानवतावादी संकट : २० लाख लोक तंबूंमध्ये राहत आहेत. औषधांचा पुरवठा थांबल्याने रोगराईचा धोका आहे.
- हिंसाचार : छोट्या चकमकी आणि हल्ल्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत ७३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुढील आव्हाने
- एकूण जीवितहानी : ७२,३१७ (७ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत)
- मदत मार्ग : केवळ एकच सीमा (इस्रायलच्या नियंत्रणाखालील) सुरू.
- नवा पेच : लेबनॉनमध्ये इंडोनेशियाच्या तीन शांती सैनिकांचा मृत्यू झाल्याने, गाझामध्ये सैन्य पाठवण्यास इतर देश आता कचरत आहेत.
- येत्या काळात गाझाची पुनर्रचना करणे, हमासचे दोन दशकांचे शासन संपवणे आणि तिथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात करणे ही सर्वात मोठी आव्हाने असणार आहेत.
- इराण युद्ध संपेपर्यंत गाझाचे भविष्य अधांतरीच राहणार आहे.