"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:07 IST2025-01-30T16:06:04+5:302025-01-30T16:07:05+5:30
ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे.

"जिथे विष मिसळवलं गेलंय, ती जागा दाखवा"; अरविंद केजरीवालांना निवडणूक आयोगाचे पत्र
Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या दूषित पाण्याबद्दल केलेल्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवालांकडे याचे पुरावे मागितले असून, ज्या ठिकाणी विष पाण्यात विष मिसळवलं जात आहे, ती जागा दाखवा असे आयोगाने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना म्हटलं आहे की, पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त होणे आणि पाण्यात विष मिसळवणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोन्ही एकत्र करू नका. पाण्यात विष मिसळवलं गेलं, याबद्दलचे ठोस पुरावे शुक्रवारी (३१ जानेवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावेत. जर उत्तर समाधानकारक नसेल, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयोगाने केजरीवालांना दिला आहे.
निवडणूक आयोगाने केजरीवालांना कोणते प्रश्न विचारले?
यमुना नदीत विष कोणी मिसळवलं आहे?
यमुना नदीत कोणते विष कालवण्यात आले आहे?
यमुना नदीत विष असल्याचा शोध कोणत्या अभियंत्याने लावला आहे?
यमुना नदीत कोणत्या ठिकाणी विष आढळून आले आहे?
पाण्यात विष पसरू नये म्हणून कशा पद्धतीने रोखले गेले आहे?
आयोगाने म्हटले आहे की, तथ्यांच्या आधारावर आणि कायदेशीर पुराव्यांसह उत्तर सादर करावे. जेणेकरून आयोग या प्रकरणाची चौकशी करेल आणि पुढील कारवाई करेल.
केजरीवालांना दिलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, अशा आरोपाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जसे की स्थानिक गटांमध्ये, दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये वैर निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थाही बिघडू शकते.