भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:07 IST2025-05-27T12:06:51+5:302025-05-27T12:07:18+5:30
S. Jaishankar News: आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...
S. Jaishankar News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही अनेक देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली. भारत आणि पाकिस्तानशी प्रदीर्घ चर्चेनंतर अखेरीस युद्धविरामासाठी तयार केले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. परंतु, काहीच दिवसांत आपल्या याच विधानावरून ट्रम्प यांनी घुमजाव केले. आपण मध्यस्थी नाही, तर मदत केली, असे म्हटले. परंतु, यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. यातच एस. जयशंकरजर्मनी दौऱ्यावर असताना, भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का, असा प्रश्न विचारण्यात आला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का?
एका जर्मन पत्रकाराने एस. जयशंकर यांना विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत जगाने अमेरिकेचे आभार मानावे का? यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, युद्धविरामासाठी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये थेट संपर्क झाला होता. त्यातच युद्धविरामावर सहमती झाली होती. आम्ही पाकिस्तानचे मुख्य हवाई तळ आणि संरक्षण प्रणालींना प्रभावीपणे लक्ष्य केले होते. त्यामुळे युद्धविरामासाठी कोणाचे आभार मानावे? मला वाटते की, भारतीय सैन्य. कारण भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळेच पाकिस्तानला असे म्हणण्यास भाग पाडले की, आम्ही लढाई थांबवण्यास तयार आहोत.
दरम्यान, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान जग अणुयुद्धापासून किती दूर होते? असाही प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर, खरे सांगायचे तर, मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटते. आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांना दाखवून दिले की, आम्ही काय करू शकतो. आम्ही त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली. त्यांच्या मागणीवरून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु या काळात कधीही अणुहल्ल्याची चर्चा झाली नाही.