अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:51 IST2025-11-27T07:50:27+5:302025-11-27T07:51:13+5:30
Firing Near White House: जगातील महासत्ता म्हणून बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसपासून काही दूर अंतरावर असलेल्या रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.

अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत
जगातील महासत्ता म्हणून बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसपासून काही दूर अंतरावर असलेल्या रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, त्यामध्ये नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे. हा गोळीबार स्थानिक वेळेनुसार दुपारी २.३० च्या सुमारास झाला. जखम नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा गोळीबार व्हाईट हाऊसजवळ झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. असॉल्ट रायफल्स घेऊन सज्ज असलेले अधिकारी अनेक ब्लॉक्समध्ये पसरले आहेत, तसेच संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे.
गोळीबारानंतर या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांची अनेक वाहने आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी विविध पथके सक्रिय झाली आहेत. स्थानिक यंत्रणांसोबत एफबीआय या गोळीबाराचा तपास करत असल्याचे एफबीआयच्या वॉशिंग्टन फिल्ड ऑफिसरने सांगितले. मात्र हा गोळीबार का झाला, हे या अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही. एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी गोळीबार होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तपास यंत्रणा कुठलीही माहिती घाईगडबडीत देऊ इच्छित नसल्याचे समोर येत आहे.