कुख्यात अल जवाहिरीला पाकिस्तानमध्ये आश्रय
By Admin | Updated: April 23, 2017 01:12 IST2017-04-23T01:12:14+5:302017-04-23T01:12:14+5:30
कुख्यात अतिरेकी संघटना अल-कैदाचा प्रमुख आयमन अल्-जवाहिरी याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने कराचीत दडवून ठेवले असल्याचे खळबळजनक

कुख्यात अल जवाहिरीला पाकिस्तानमध्ये आश्रय
नवी दिल्ली : कुख्यात अतिरेकी संघटना अल-कैदाचा प्रमुख आयमन अल्-जवाहिरी याला पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने कराचीत दडवून ठेवले असल्याचे खळबळजनक वृत्त अमेरिकी नियतकालिक ‘न्यूज वीक’ने
दिले आहे. अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानातच ठार मारले होते. त्याच्या मृत्यूनंतर अल-कैदाची सूत्रे जवाहिरी याने हाती घेतली होती.
न्यूज वीकच्या वृत्तानुसार, २00१ मध्ये अमेरिकी फौजांनी अल-कैदाला अफगाणिस्तातून हाकलले, तेव्हा जवाहिरी पाकिस्तानच्या आश्रयास आला. तेव्हापासून आयएसआय त्याला सांभाळत आहे. ही बाब अमेरिकेलाही माहीत असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बराक ओबामा प्रशासनाने जवाहिरी याचा ड्रोन विमानाद्वारे पाठलाग केला होता. तो दडून बसलेली इमारत बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केली होती. दैव बलवत्तर म्हणून जवाहिरी या हल्ल्यातून वाचला. त्याच्या अंगावर भिंत कोसळली होती. त्याचा चष्मा फुटला होता. सीमावर्ती भागातील तालिबानी संघटना अफगाण सरकारशी शांतता वाटाघाटी करीत आहेत. त्यामुळे अल-कैदाची ब्याद त्यांना नको आहे. या पार्श्वभूमीवर आयएसआयने जवाहिरीला कराचीत हलवले आहे. कराचीत कट्टरपंथी इस्लामला चांगले समर्थन आहे, शिवाय १९ व्या शतकातील चिंचोळ्या रस्त्यांचे हे शहर लपून बसण्यासाठीही आदर्श आहे. (वृत्तसंस्था)
डोळे मिटण्यापूर्वी करायचाय अखेरचा हल्ला
- आयमन अल-जवाहिरीला डोळे मिटण्यापूर्वी अमेरिकेवर अखेरचा हल्ला करायचा असल्याचे सूत्रांनी ‘न्यूज वीक’ला सांगितले. हा हल्ला प्रचंड मोठा आणि खतरनाक असेल, असे सूत्रांनी सांगितले.
- जाणकारांच्या मते, अल-कैदामध्ये अजूनही अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनालाही याची जाणीव आहे.
लादेनचा मुलगाही पाकिस्तानातच
एका अधिकाऱ्याने ‘न्यूज वीक’ला सांगितले की, ओसामा बिन लादेनचा २६ वर्षीय मुलगा हमजा बिन लादेनलाही आयएसआयने पाकिस्तानमध्ये दडवून ठेवले आहे. दहशतवादाचा उदयोन्मुख तारा म्हणून हमजाकडे पाहिले जाते