निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:43 IST2025-11-17T14:43:00+5:302025-11-17T14:43:44+5:30
Sheikh Hasina News: गतवर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनावेळी मानवतेविरोधात गंभीर गुन्हे केल्या प्रकरणी इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने शेख हसीना यांना दोषी ठरवले असून, तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या या लवादाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खेख हसिना यांना बांगलादेशमधील इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने मोठा धक्का दिला आहे. गतवर्षी देशात झालेल्या आंदोलनावेळी मानवतेविरोधात गंभीर गुन्हे केल्या प्रकरणी या लवादाने शेख हसीना यांना दोषी ठरवले असून, तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या या लवादाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या लवादाने शेख हसीना यांच्याविरोधातील हा निकाल सहा भाग आणि ४०० पानांमधून दिला आहे.
बांगलादेशमध्ये २०२४ साली जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान, विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी शेख हसीना यांनी दिलेल्या आदेशांमुळे अनेक निरपराध आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, हे आंदोलक निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर शेख हसीना ह्या देश सोडून भारतात आश्रयाला आल्या होत्या. तेव्हापासून त्या भारतामध्ये विजनवासात राहत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी शेख हसीनाच दोषी होत्या, हे कोर्टाने मान्य केले आहे. फिर्यादी पक्षाने सादर केलेले पुरावेही कोर्टाने लोकांसमोर ठेवले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे. शेख हसीना जानेवारी २०२४च्या निवडणुकीनंतरच हुकूमशाह बनण्याच्या मार्गावर होत्या. त्यांनी जानेवारी २०२४च्या निवडणुकीत विरोधी पक्षाला चिरडले. यानंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले गेले.
या हत्या प्रकरणात बांगलादेश सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी बनवले होते. तसेच बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय कोर्टात या तिघांविरुद्ध खटला सुरू असताना, माजी पोलीस महानिरीक्षक अल-मामून माफीचे साक्षीदार बनले
अल-मामून यांनी हसीना यांच्या विरोधात साक्ष देण्याचे मान्य केले. याच दरम्यान, हसीना यांचा एक ऑडिओ समोर आला, ज्यात त्या पोलीस प्रमुखांशी बोलत होत्या. या ऑडिओची सत्यता सिद्ध होताच हसीना यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी वेगाने सुरू झाली आणि कोर्टाने त्यांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.