शांघाय परिषद : चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:15 IST2018-06-11T05:15:20+5:302018-06-11T05:15:20+5:30
शनिवार व रविवारी येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भारत वगळता इतर सातही सदस्य देशांनी चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा दिला व या योजनेच्या यशासाठी कटिबद्धता व्यक्त केली.

शांघाय परिषद : चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध
चिंगदाओ (चीन) - शनिवार व रविवारी येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भारत वगळता इतर सातही सदस्य देशांनी चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा दिला व या योजनेच्या यशासाठी कटिबद्धता व्यक्त केली.
मात्र या परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास करून शेजारी देशांशी व ‘एससीओ’मधील सदस्य देशांची संपर्काची साधने वाढविण्यावर भर दिला.
याच योजनेचा एक भाग असलेल्या ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’चा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील वादग्रस्त गिलगिट-बालतीस्तानमधून जात असल्याने राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर भारताने आपला विरोध कायम ठेवत या परिषदेत या मुद्द्यांवर अन्य देशांची री ओढली नाही. परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या १७ पानी चिंगदाओ जाहीरनाम्यात चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड’ योजनेस भारत वगळून इतर देशांनी पाठिंबा दिला.
भारताची ही भूमिका नवी
नाही. पंतप्रधानांनी याआधीही ती स्पष्ट केली आहे. त्यामुळे
या परिषदेतही भारताने वेगळी
भूमिका घेणे अपेक्षित नव्हते,
असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. परिषदेत बोलताना मोदींनी स्पष्ट केले की, परस्परांशी संपर्क, व्यापार व देवाण-घेवाण वाढेल, अशा सर्वच प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे.
मात्र अशा योजना सर्वांना
सामावून घेणाºया, पारदर्शी व संबंधित देशाच्या क्षेत्रिय सार्वभौमत्वाचा आदर करणाºया असायला हव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. हल्ली वाहतुकीची साधने व डिजिटल क्रांतीमुळे भूगोल बदलत आहे. त्यामुळे शेजारी देश आणि ‘एससीओ’मधील देशांशी संपर्क वाढविण्यास भारताचा अग्रक्रम राहील.
गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून सामील करून घेतल्यानंतर
भारताचे पंतप्रधान यंदा या
परिषदेत प्रथमच सहभागी झाले. या परिषदेच्या यशासाठी भारत नेहमीच सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे त्यानी आश्वासन दिले. भारत व पाकिस्तानखेरीज चीन, रशिया, इराण, कझागस्तान, उजबेकिस्तान, किरगिझिस्तान या मूळ सदस्य
देशांचे नेते या परिषदेत सहभागी झाले. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान मोदी व पाक अध्यक्षांचे हस्तांदोलन
या पत्रकार परिषदेला विविध देशांचे नेते उपस्थित होते; पण साºयांचे लक्ष भारत व पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांकडेच लागलेले होते. चीनमध्ये आयोजित एससीओ परिषदेसाठी आठ देशांचे प्रमुख नेते उपस्थित असून, त्यातील पाकिस्तान वगळता प्रत्येक देशाच्या नेत्याशी नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन चर्चा केली होती. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मात्र भारत व पाकिस्तानचे प्रमुख नेते समोरासमोर आले.
चिंगदाओ : शांघाय सहकार्य संघटना (एससीओ)च्या १८व्या परिषदेनिमित्त रविवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तिथे उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसैैन यांनी औपचारिकतेचा भाग म्हणून परस्परांशी हस्तांदोलन केले. दोन्ही देशांतील संबंध सध्या अत्यंत तणावाचे बनलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्षवेधक ठरली आहे.
२०१६ साली पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी छावणीवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. पाकमध्ये बॉम्बस्फोट घडविणे, हेरगिरी करणे या आरोपांखाली अटक केलेला भारताचा माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हा तणाव वाढला होता. उरी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने १९व्या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला होता. बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनीही बहिष्कार घातल्याने ही परिषद अखेर गुंडाळावी लागली होती.
....तर विदेशी पर्यटकांची संख्या दुप्पट होईल
भारतात येणाºया विदेशी पर्यटकांच्या एकूण संख्येपैैकी फक्त सहा टक्के पर्यटक शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांतून येतात. या गटातील देशांनी पर्यटनावर लक्ष केंद्रित केले तर ही संख्या दुप्पट करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एससीओ परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले की, या गटातील सदस्य देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढण्याची गरज आहे. चीन, रशिया, किरगिझ प्रजासत्ताक, कझाखस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांनी २००१ साली शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना केली.
भारत व पाकिस्तानला या गटाचे गेल्या वर्षी सदस्यत्व मिळाले. त्यानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. जागतिक लोकसंख्येत एससीओ देशातील लोकसंख्येचा वाटा ४२ टक्के इतका आहे.