शाहरुख खानची बहीण पाकिस्तानात अपक्ष निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 16:56 IST2018-06-08T16:56:22+5:302018-06-08T16:56:22+5:30
नूरजहां आपल्या परिवारासोबत शाह वाली कटाल परिसरात राहते. ती शाहरुखला भेटण्यासाठी दोनदा भारतात आली होती.

शाहरुख खानची बहीण पाकिस्तानात अपक्ष निवडणूक लढवणार
मुंबई : शाहरुख खानची चुलत बहीण नूरजहां ही पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी होत असलेली विधानसभा निवडणूक लढवणार आहे. नूर जहां खैबर पख्तूनख्वा येथील विधानसभेच्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. रिपोर्टनुसार, नूरजहां आपल्या परिवारासोबत शाह वाली कटाल परिसरात राहते. ती शाहरुखला भेटण्यासाठी दोनदा भारतात आली होती.
प्रसारमाध्यामांशी बोलताना नूरजहांने सांगितले की, 'मला आशा आहे की, ज्याप्रकारे लोक शाहरुख खानला प्रेम देतात, सपोर्ट करतात तसंच प्रेम मला देतील. मला महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे'.
(Image Credit: swarajyamag.com)
शाहरुखला जायचं आहे पेशावरला
शाहरुख खान याचा परिवार पेशावर येथील आहे. त्यामुळे शाहरुख खानला त्याच्या मुलांना एकदा पेशावरला घेऊन जायचं आहे. एका इव्हेंटमध्ये बोलताना शाहरुख खान म्हणाला होता की, 'माझा परिवार पेशावरमधून आहे. आताही परिवारातील काही लोक तिकडे राहतात. मी पेशावरला जाण्यासाठी फार उत्सुक आहे. मला माझ्या मुलांनाही एकडा तिथे घेऊन जायचं आहे कारण माझेही वडील मी 15 वर्षाता असताना तिथे घेऊन गेले होते'.
तो पुढे म्हणाला होता की, माझ्याकडे अजूनही तेव्हांच्या खूप आठवणी आहेत. आम्ही तेव्हा पेशावर, कराची आणि लाहोरमध्ये फार चांगला वेळ घालवला होता. मलाही एकदा माझ्या मुलांना तिथे घेऊन जायचं आहे'.