पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कमालीचं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. एवढंच नाही तर दोन्ही देशांमध्ये कधीही संघर्षाला तोंड फुटू शकतं, असं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींमुळे सध्या पाकिस्तानमधील सरकार आणि लष्कराची त्रेधातिरपीट उडाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय असलेल्या नजम सेठी यांनी पाकिस्तानला एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अमेरिकेत भारतीयांचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी आकर्षक पाकिस्तानी महिलांना अमेरिकेत पाठवले पाहिजे, असा सल्ला सेठी यांनी दिला आहे.
या संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, अमेरिकेत भारतीयांच्या असलेल्या प्रभावाचा सामना करायचा असेल, जर अमेरिकेत असलेला भारतीय लॉबीचा प्रभाव कमी करायचा असेल, तर आपण ज्या महिला पबमध्ये जाऊ शकतील, बुद्धिजीवी वर्गात मिसळू शकतील, आपल्या आकर्षणाचा वापर करून अमेरिकन थिंक टँकला प्रभावीत करू शकतील, अशा महिलांना अमेरिकेत पाठवलं पाहिजे. मात्र आता नजम सेठी यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
काही महिलांनी सोशल मीडियावर लिहिलं की, आम्ही देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी आमची बुद्धिमत्ता घेऊन अमेरिकेत जातो. आकर्षण विकायला जात नाही. काही जणांनी लिहिलंय की, नजम सेठी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही नजम सेठी यांनी केलेलं विधान हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. आम्ही अजून पारंपरिक विचारामधून बाहेर पडलेलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी आणि भारतात राजदूत राहिलेल्या अब्दुल बासित यांनीही सेठी यांच्यावर टीका केली आहे. मुत्सद्देगिरीमध्ये आकर्षण नव्हे तर प्रतिष्ठा विचार आणि संवाद मत्त्वपूर्ण ठरतो. नजरम सेठी यांच्या विधानामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा आणि महिलांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.