"माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा"; बांगलादेशने भारताकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:43 IST2024-12-23T19:42:06+5:302024-12-23T19:43:33+5:30
पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारत आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी बांगलादेश सरकारने भारताकडे केली आहे.

"माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवा"; बांगलादेशने भारताकडे केली मागणी
बांगलादेशात हिंसाचार भडकल्यानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारतात आलेल्या शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी बांगलादेश सरकारने भारताकडे केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार डॉ. तौहीद हुसैन यांनी अधिकृतपणे ही मागणी केली आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार डॉ. तौहीद हुसैन यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा मांडला. बांगलादेश सरकारने भारत सरकारला एक 'नोट व्हर्बल' पाठवली असून, त्यात बांगलादेशात न्यायालयीन प्रकरणांना सामोर जाण्यासाठी हसीना यांचं प्रत्यार्पण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.
नोट व्हर्बल म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदाच्या अनुषंगाने वापरला जाणार संदेश. हा साधारणतः तिसऱ्या व्यक्तींकडून लिहिला जातो आणि त्यावर स्वाक्षरी केली जात नाही. याचा वापर देशातील स्थितीची माहिती देण्यासाठी वा कुठली तरी विनंती करण्यासाठी केला जातो.
बांगलादेशात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना या ५ ऑगस्ट रोजी भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्या भारतात वास्तव्याला आहेत. ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीना आणि काही माजी कॅबिनेट मंत्र्यांविरोधात, सल्लागारांविरोधात, तसेच लष्करी आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहार प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे.
बांगलादेशने भारताला पाठवलेल्या नोट व्हर्बलमध्ये म्हटले आहे की, शेख हसीना यांच्याविरोधात न्यायिय प्रक्रिया सुरू असून, त्यांना परत पाठवावे.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हुसैन म्हणाले, "आम्ही भारत सरकारला एक नोट व्हर्बल पाठवली आहे. त्यात शेख हसीना यांना परत पाठवावे, असे म्हटलेले आहे. प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पत्र दिलेले असून, प्रक्रिया सुरू आहे."
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या नेतृ्त्वाखाली हंगामी सरकार अस्तित्वात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकाचा मुद्दा ऐरणीवर आहे. शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांना यासाठी जबाबदार धरले होते.