Saudi Arabia Visa Ban:सौदी अरेबियानेभारतासह १४ देशांना व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. भारतासह १४ देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे. सौदीमध्ये काही परदेशी नागरिक नोंदणीशिवाय हज करत होते. अशा लोकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाचे समोर आले आहे. २०२४ मध्ये झालेल्या घटनेनंतर सौदी क्राउन प्रिन्सने अधिकाऱ्यांना व्हिसाचे नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर हजमध्ये होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने ही घोषणा केली आहे.
हज यात्रेदरम्यान, सौदी अरेबियामध्ये गेल्यावर्षी एक मोठी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये १,००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हजयात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली होती आणि त्याचा तिथल्या व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडला. यादरम्यान, उष्माघाताने अनेकांना जीव गमवावा लागला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नोंदणीशिवाय हज यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचा समावेश होता. या घटनेनंतर हज यात्रेकरूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना हजदरम्यान सुरक्षा व्यवस्था सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता परदेशी प्रवाशांसाठी व्हिसा नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
सौदी अरेबियाने १४ देशांच्या नागरिकांना कुटुंब, प्रवास आणि उमराह या तीनही प्रकारचे व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी जूनच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे. याच दरम्यान यंदाची हज यात्राही संपणार आहे. भारताव्यतिरिक्त ज्या देशांवर ही बंदी घालण्यात आली आहे त्यात पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. तसेच सौदी अरेबियात येणारे परदेशी नागरिक १३ एप्रिलपर्यंतच उमराह व्हिसासाठी अर्ज करू शकतात.
१३ एप्रिलनंतर हज यात्रा संपेपर्यंत कोणताही नवीन उमराह व्हिसा जारी केला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. काही परदेशी नागरिक व्हिजिटर व्हिसावर किंवा फॅमिली व्हिसावर सौदीत येतात आणि नंतर योग्य नोंदणी न करता हज यात्रेमध्ये सहभागी होतात. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी ही बंदी घालण्यात आल्याचे सौदी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, हज यात्रेकरूंच्या मदतीसाठी सौदीने १६ भाषांमध्ये डिजिटल हज आणि उमरा गाइड जारी केले आहेत. याद्वारे प्रवाशांना सुरक्षित हज यात्रेच्या प्रक्रियेची माहिती दिली जाईल. हजदरम्यान बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सौदी अरेबियात प्रवेश केल्यास ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल, असा कडक इशारा सौदी प्रशासनाने दिला आहे. याशिवाय १०,००० सौदी रियाध म्हणजेच २ लाख २८ हजार रुपये इतका दंडही ठोठावण्यात येणार आहे.