माजी मिस बांगलादेश राहिलेली मेघना आलम हिला अचानक बांगलादेशचे सध्याचे सर्वेसर्वा मोहम्मद युनुस यांनी ३० दिवसांसाठी तुरुंगात टाकले आहे. यावरून खळबळ उडालेली आहे. सौदीच्या राजदुतासोबत कथित अफेअरमुळे मेघनावर ही वेळ आल्याचे सांगितले जात आहे.
मेघनाचे सौदीच्या राजदुतासोबत प्रेम संबंध होते, यामुळे या दोन देशांच्या राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मेघना आलम ही बांगलादेशी मॉडेल आणि मिस अर्थ २०२० आहे. तिला युनुस सरकारने विशेष अधिकारांखाली ३० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे तिचे समर्थक भडकले आहेत. तिला कोणत्याही अधिकृत आरोपांशिवाय अटक करण्यात आल्याचा आरोप ते करत आहेत.
आखाती देशातील एका राजदुतासोबत संबंध असल्याने तिला अटक करण्यात आल्याचा आरोप मेघनाच्या वडिलांनी बदरुल आलम यांनी केला आहे. सौदीच्या या राजदुताने मेघनाला लग्नाची मागणी घातली होती, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. हा राजदूत आणि मेघना हे रिलेशनशिपमध्ये होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतू तिने त्याला आधीच पत्नी आणि मुले असल्याने लग्नाची ऑफर नाकारली होती, असे त्यांचे म्हणणे आहे.
अटकेपूर्वी मेघनाने फेसबुक लाईव्ह करून बांगलादेशची विशेष गुप्तहेर शाखेने ९ एप्रिलच्या रात्री आपल्या ढाक्यातील घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले होते. तसेच त्यावेळी खूप वाद झाला होता, असेही तिने म्हटले होते. देशाच्या सुरक्षेत अडथळा आणणे आणि देशाच्या आर्थिक हितसंबंधांना हानी पोहोचवणे अशा आरोपांखाली तिला अटक केल्याचे पोलिसांनी म्हटले होते.
तो राजदूत कोण?
पोलिसांनुसार हा सौदीचा राजदूत एसा युसुफ आहे. त्याच्याकडून मेघनाने ५ दशलक्ष डॉलर्सची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. एसा यांनी अलीकडेच बांगलादेश सोडला होता. वाद वाढल्यानंतर लगेचच मेघना आलमने जाहीरपणे बोलायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर पोस्ट करायलाही सुरुवात केली होती.